मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी समोर आणलेल्या एका कथित ऑडिओ क्लिपमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा सुरू झाली असून, या वादावर आता खासदार श्रीकांत शिंदे यांनी आपली पहिली अधिकृत प्रतिक्रिया दिली आहे. मनोज जरांगे यांनी या क्लिपचा संदर्भ देत भाजपाने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जरांगेंना देण्यासाठी 500 कोटी रुपये दिल्याचा खळबळजनक दावा केला होता. या दाव्यावरून महायुतीमध्ये वातावरण तापलेले असतानाच, श्रीकांत शिंदे यांनी या संपूर्ण प्रकरणावर उपरोधिक आणि मिश्किल टिप्पणी करत सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.
‘ते 500 कोटी कुठे गेले? मीही त्यांचाच शोध घेतोय’; श्रीकांत शिंदेंची टोलेबाजी
प्रसारमाध्यमांशी बोलताना खासदार श्रीकांत शिंदे म्हणाले की, कथित 500 कोटी रुपयांच्या व्यवहारावरून जरांगे पाटील यांच्या मनात जो प्रश्न निर्माण झाला आहे, तोच प्रश्न मलाही पडला आहे. जर कुणाकडे 500 कोटी रुपये आले असतील, तर ते माझ्यापर्यंत का पोहोचले नाहीत, असा सवाल त्यांनी केला. ते पुढे म्हणाले की, एवढी मोठी रक्कम ठेवण्यासाठी नक्की किती गाड्या लागतील, यावरच सध्या आमची चर्चा सुरू होती. ज्या व्यक्तीने हे पैसे घेतले असे म्हटले जात आहे, त्याचा शोध घेण्यासाठी मी स्वतः निघालो असून, जर माध्यम प्रतिनिधींना त्याबाबत काही माहिती मिळाली तर त्यांनी नक्की सांगावे, असा मिश्किल टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा –जरांगेंच्या ऑडिओ क्लिपचं गूढ वाढलं, प्रसाद लाड यांच्या विधानाने नवा ट्विस्ट
कथित ऑडिओ क्लिपचा वाद आणि उच्चस्तरीय चौकशीचे आदेश
मनोज जरांगे पाटील यांनी दोन महिलांमधील संभाषणाची एक ऑडिओ क्लिप जाहीर केली होती. या क्लिपच्या आधारे भाजपाकडून शिंदे गटाला 500 कोटी रुपये दिल्याचे सांगत, जरांगेंनी एकनाथ शिंदे यांच्याकडे स्पष्टीकरणाची मागणी केली होती. या धक्कादायक वादानंतर राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले होते. या घटनेची गंभीर दखल घेत शिंदे गटाच्या नेत्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा केली होती. या प्रकरणात सत्य काय आहे हे समोर आणण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी तात्काळ उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले असून, लवकरच यामागील सत्य स्पष्ट होईल, असे सांगण्यात आले आहे.