मुंबई: मुंबईत व्यावसायिक म्हणून ओळखले जाणारे सुशील केडिया सध्या चर्चेच्या केंद्रस्थानी आहेत. सोशल मीडियावर त्यांच्या वादग्रस्त पोस्टनंतर राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली होती. काही दिवसांपूर्वी त्यांनी एक्स (ट्विटर) या प्लॅटफॉर्मवर मराठी शिकण्यास नकार देणारी एक पोस्ट शेअर केली होती. त्या पोस्टमध्ये त्यांनी थेट राज ठाकरे यांच्यावर टीका करत मराठी शिकणार नसल्याचे स्पष्ट म्हटले होते.
'मी गेली 30 वर्षं मुंबईत राहत आहे, पण मराठी शिकलेलो नाही आणि शिकणारही नाही. जोपर्यंत राज ठाकरेंसारखे लोक मराठीचा आग्रह धरतात, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही,' असे वादग्रस्त विधान केडियांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते.
हेही वाचा:'मी मराठी शिकणार नाही' म्हणणं पडलं महागात; मनसे कार्यकर्त्यांकडून केडियांच्या ऑफिसची तोडफोड
या वक्तव्यानंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या नेत्यांनी तीव्र प्रतिक्रिया दिल्या. काहींनी सोशल मीडियावर आक्रमक पोस्ट केल्या, तर काहींनी थेट केडियांच्या विरोधात मोर्चा उभारण्याची भाषा केली.
यानंतर परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अखेर सुशील केडिया यांनी एक माफीनामा जारी केला आहे. 'माझ्या विधानामुळे कुणाच्या भावना दुखावल्या असतील, तर मी मन:पूर्वक दिलगीर आहे. माझा उद्देश कोणालाही अपमानित करणे नव्हता,' असे त्यांनी म्हटले आहे.