सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीसंदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली असून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा दिसाला मिळाला आहे. जत विकास सोसायटी गटातून भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी दाखल केलेला उमेदवारी अर्ज सर्वोच्च न्यायालयाने वैध ठरवला. बँकेच्या निवडणुकीसाठी त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता.
यापूर्वी मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठाने त्यांचा अर्ज अवैध ठरवला होता. त्यामुळे, आमदार पडळकर यांना हा मोठा धक्का मानला जात होता. त्यानंतर आता देशाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या समोर या महत्त्वाच्या खटल्याची सुनावणी पार पडली. ज्यात सर्वोच्च न्यायालयाकडून भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे. दरम्यान आता त्यांना बँकेची निवडणूक लढवण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
नेमकं प्रकरण काय?
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक मंडळाच्या 21 जागांच्या निवडणुकांसाठी गोपीचंद पडळकर यांनी जत सोसायटीच्या माध्यमातून उमेदवारी अर्ज दाखल केला होता. मात्र, त्यांनी अर्जासोबत जोडलेली कागदपत्रे बनावट असल्याचा आरोप काँग्रेसचे नेते आणि जतचे माजी आमदार विक्रम सावंत तसेच बाजार समितीचे माजी सभापती सुजय शिंदे यांनी केला होता. त्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर खंडपीठात याप्रकरणाची याचिका दाखल केली.
या प्रकरणाची सुनावणी करताना कोल्हापूर खंडपीठाने सादर करण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारे पडळकर यांचा उमेदवारी अर्ज अवैध ठरवला. त्यामुळे त्यांच्या निवडणूक लढवण्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. त्यानंतर सुप्रीम कोर्टाने आज मोठा निर्णय घेत पडळकर यांचा अर्ज वैध ठरवला आहे. सर्वौच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निर्माण झालेल्या कायदेशीर अडचणीतून पडळकर यांना दिलासा मिळाला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.