उत्तर प्रदेशात आगामी विधानसभा निवडणुकीचे वेध लागलेले असतानाच सत्ताधारी भाजपला त्यांच्याच बालेकिल्ल्यात मोठा राजकीय झटका बसला आहे. एकेकाळी इतर पक्षातील नेत्यांची भाजपमध्ये येण्यासाठी चढाओध पाहायला मिळत होती, मात्र आता राजकीय चित्र पूर्णपणे बदलताना दिसत आहे. समाजवादी पार्टीचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपचे माजी खासदारांसह इतर घटक पक्षांच्या अनेक वरिष्ठ नेत्यांनी समाजवादी पार्टीत जाहीर प्रवेश केला. एवढेच नव्हे तर येत्या काळात भाजपचे अनेक विद्यमान आमदारही सपामध्ये दाखल होणार असल्याचा दावा अखिलेश यादव यांनी केल्याने उत्तर प्रदेशच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.
माजी खासदार राजपाल सैनी आणि आघाडीच्या नेत्यांची सपामध्ये हजेरी
सपामध्ये प्रवेश करणाऱ्या प्रमुख नेत्यांमध्ये भाजपचे माजी खासदार राजपाल सैनी आणि शामली येथील भाजप प्रदेश कार्यसमिती सदस्य हरबीर मलिक यांचा समावेश आहे. यासोबतच आझाद समाज पार्टीचे पवन सैनी, निषाद पार्टीचे शुभेंद्र आचार्य तसेच राष्ट्रीय लोकदलाचे (RLD) संजीव प्रधान, राजेंद्र मलिक, विजेंद्र मलिक आणि शुभम मलिक यांनीही समाजवादी पार्टीचा झेंडा हातात घेतला आहे. मीरापूर मतदारसंघातून आगामी विधानसभा निवडणुकीची उमेदवारी मिळण्याची शक्यता नसल्यानेच माजी खासदार राजपाल सैनी यांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन सपामध्ये प्रवेश केल्याचे राजकीय तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
हेही वाचा – ‘CJP च्या आंदोलनामागे एलॉन मस्क…’; भाजपच्या माजी खासदाराच्या दाव्याने राजकीय चर्चांना उधाण
‘ही तर केवळ सुरुवात’; अखिलेश यादव यांचा भाजपवर जोरदार हल्लाबोल
नवीन नेत्यांचे पक्षात स्वागत करताना अखिलेश यादव यांनी भाजपवर अत्यंत तीक्ष्ण शब्दांत टीका केली. ते म्हणाले की, भाजपच्या कारभाराला जनता पूर्णपणे कंटाळली असून आता त्यांच्याकडे लोकांचे समर्थन उरलेले नाही. त्यामुळेच भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांचे अनेक नेते आणि विद्यमान आमदार आमच्या संपर्कात आहेत. सध्या फक्त इतर पक्षांच्या नेत्यांचा प्रवेश झाला आहे, आमदारांचा अधिकृत प्रवेश अजून बाकी आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यमातून सत्ताधारी पक्ष विविध राजकीय कारस्थाने रचत असल्याचा आरोपही त्यांनी या वेळी केला.