नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक निकालाच्या पहिल्या टप्प्यात मतांचे मोठे फेरफार पाहायला मिळत असून राजकीय वर्तुळातील धाकधूक प्रचंड वाढली आहे. टपाली आणि पहिल्या टप्प्यातील मतमोजणी पूर्ण झाली असून महायुतीचे उमेदवार सुधाकर कोहळे आणि काँग्रेसचे ॲड. अभिजित वंजारी यांच्यात प्रत्येक टेबलवर अवघ्या 10 ते 15 मतांचा फरक पाहायला मिळत आहे. या चुरशीच्या लढतीमध्ये अनेक मतदारांनी चुकीच्या पद्धतीने पसंतीक्रम नोंदवल्याने मोठ्या संख्येने मते अवैध ठरली आहेत, ज्यामुळे प्रशासकीय पातळीवर अत्यंत बारकाईने मोजणी सुरू आहे.
अवैध मतांचा सुळसुळाट
दरम्यान, सकाळी 8 वाजता 84 टेबलवर मतमोजणीची सुरुवात झाली असून पहिल्या टप्प्यात 84 हजार मतपत्रिकांची मोजणी पूर्ण झाली आहे. मतदारांनी पसंतीक्रम न लिहिता नावापुढे खुणा करणे किंवा सर्व 38 उमेदवारांना एकाच वेळी पसंतीक्रम देणे अशा चुका केल्यामुळे अवैध मते बाद करण्याचे काम सुरू आहे. दुसऱ्या टप्प्यातील 81 हजार मतांची मोजणी पूर्ण झाल्यानंतर अवैध मते पूर्णपणे वगळली जातील आणि त्यानंतरच उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असणारा अंतिम ‘विजयाचा कोटा’ स्पष्ट होईल.
नितेश कराळे मास्तर ठरण्याची शक्यता ‘किंग मेकर’
अपक्ष उमेदवार नितेश कराळे (कराळे मास्तर) यांनी पहिल्या पसंतीक्रमाची अनपेक्षित आणि भरघोस मते मिळवून मुख्य राजकीय पक्षांची सर्व गणिते पूर्णपणे बिघडवली आहेत. जर पहिल्या पसंतीच्या मतात भाजप किंवा काँग्रेसच्या उमेदवाराला निर्धारित विजयाचा कोटा गाठता आला नाही, तर दुसऱ्या आणि तिसऱ्या पसंतीक्रमाच्या मतांची मोजणी करावी लागेल. अशा परिस्थितीत कराळे मास्तर यांच्या खात्यात गेलेली मते आणि त्यांची दुसऱ्या पसंतीची मते निर्णायक ठरणार असून ते या निवडणुकीत ‘किंग मेकर’च्या भूमिकेत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा – शिक्षक अन् पदवीधर निवडणुकीच्या निकालात मोठा उलटफेर; पुणे, मराठवाडा अन् विदर्भात ‘या’ उमेदवारांनी घेतली आघाडी
अंतिम निकालासाठी दुपारपर्यंत प्रतीक्षा करावी लागण्याची शक्यता
रिंगणात 38 उमेदवार असल्यामुळे आणि पसंतीक्रमाच्या मतमोजणीची प्रक्रिया अत्यंत क्लिष्ट व गुंतागुंतीची असल्याने निकाल स्पष्ट होण्यास वेळ लागत आहे. मतमोजणीच्या सर्व फेऱ्या पूर्ण होऊन उद्या दुपारी पर्यंत अधिकृत आणि अंतिम निकाल हाती येईल असा अंदाज निवडणूक प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. नागपूर पदवीधरची ही मानाची खुर्ची नेमकी कोणाकडे जाते, यावर संपूर्ण राज्याचे लक्ष केंद्रित झाले आहे.