Sikandar Sheikh Bail: महाराष्ट्रातील प्रसिद्ध कुस्तीपटू आणि 'महाराष्ट्र केसरी', 'रुस्तम-ए-हिंद' या किताबांनी सन्मानित सिकंदर शेख याला पंजाब पोलिसांनी शस्त्र तस्करी प्रकरणात अटक केल्यानंतर आता जामीन मंजूर झाला आहे. या घटनेमुळे काही दिवसांपासून राज्यात मोठी खळबळ माजली होती.
सिकंदर शेखला पंजाबमध्ये अटक
सिकंदर शेखला 30 ऑक्टोबर रोजी मोहाली विमानतळावरून सीआयए (क्राइम इन्क्वायरी एजन्सी) पथकाने ताब्यात घेतले होते. त्याच्यावर आरोप करण्यात आला की, तो गुर्जर टोळीशी संबंधित शस्त्र व्यवहारात सामील आहे. त्याच्यासह चार इतर संशयितांना देखील पोलिसांनी पकडले. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपींकडून 1 लाख 99 हजार रुपये रोख, एक पिस्तुल (0.45 बोर), चार पिस्तुल (0.32 बोर), काडतुसे सापडली होती. तसेच पोलिसांनी दोन गाड्या (स्कॉर्पिओ-एन आणि एक्सयूव्ही) जप्त केल्या. या प्रकरणात खरड पोलीस ठाण्यात आर्म्स अॅक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. मात्र, सिकंदर शेखच्या कुटुंबीयांनी हे सर्व आरोप बिनबुडाचे आणि राजकीय हेतूने प्रेरित असल्याचे सांगितले.
हेही वाचा - IND vs AUS 4th T20: भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा टी20 सामना कधी आणि कुठे खेळला जाईल? 'या' ठिकाणी पाहता येईल लाईव्ह स्ट्रीमिंग
सुप्रिया सुळे यांनी घेतला पुढाकार
या प्रकरणाची बातमी समजताच राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) च्या खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतः पुढाकार घेतला. सुळे यांनी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्याशी थेट संपर्क साधून या प्रकरणाची सविस्तर माहिती घेतली. त्यांनी सिकंदर शेखला न्याय मिळावा, यासाठी योग्य चौकशीची मागणी केली होती. मुख्यमंत्री भगवंत मान यांनी त्यांना तपास पारदर्शक आणि न्याय्य होईल असे आश्वासन दिले.
हेही वाचा - Women’s World Cup 2025: महिला विश्वचषक 2025 मध्ये पाकिस्तानला किती पैसे मिळाले? रक्कमेतील फरक ऐकून तुम्हालाही बसेल धक्का!
पंजाब पोलिसांच्या ताब्यातून सिकंदर शेखची सुटका होताच महाराष्ट्रातील चाहत्यांमध्ये आणि कुस्तीविश्वात आनंद आणि दिलासा व्यक्त करण्यात आला. सिकंदर शेख हा महाराष्ट्रातील कुस्तीविश्वातील सर्वात लोकप्रिय आणि विजयी पैलवानांपैकी एक मानला जातो. 'महाराष्ट्र केसरी' आणि 'रुस्तम-ए-हिंद' ही किताबे मिळवणारा तो राज्याचा स्टार रेसलर आहे. त्याची लोकप्रियता केवळ मैदानापुरती मर्यादित नसून, ग्रामीण महाराष्ट्रात तो तरुणांचा आदर्श आणि प्रेरणा मानला जातो.