कुटुंबातील एखाद्या व्यक्तीच्या निधनाने संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळतो. जवळच्या व्यक्तीच्या आठवणी कायम जपून ठेवण्यासाठी कुटुंबीय अनेक प्रकारे प्रयत्न करत असतात. मात्र, मुंबईतील मालाड परिसरातून यापेक्षा वेगळी आणि धक्कादायक घटना समोर आली आहे. 2022 मध्ये निधन झालेल्या एका वृद्ध व्यक्तीचा मृतदेह तब्बल चार वर्षे फ्रीजरमध्ये ठेवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.
संबंधित वृद्ध व्यक्तीचे आपल्या मुला-मुलींशी अतिशय जिव्हाळ्याचे नाते होते. त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांना हा विरह स्वीकारणे कठीण जात असल्याने मृतदेहावर अंत्यसंस्कार न करता तो सुरक्षित ठेवण्यात आल्याचे सांगितले जात आहे. हा मृतदेह मालाड-कुरार पोलिस ठाण्या अंतर्गत येणाऱ्या कोकणी पाडा परिसरात असलेल्या एका डे केअर सेंटर-क्लिनिकमध्ये ठेवण्यात आला होता. तब्बल चार वर्षांनंतर हा प्रकार समोर आल्याने परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे.
2022 मध्ये 80 वर्षीय वृद्ध व्यक्तीचा कर्करोगाने मृत्यू झाला होता. घरातील कर्त्याधर्त्या व्यक्तीचा मृत्यू झाल्याने कुटुंब मानसिक धक्क्यात होते. त्यांना आपल्या वडिलांना गमवायचे नव्हते. त्यामुळे त्यांना अमेरिकेच्या एका क्रायोनिक्स सेंटरमध्ये नेऊन हा मृतदेह सुरक्षित ठेवायचा होता. भविष्यात टेक्नॉलॉजी डेव्हल्प झाल्यावर त्यांना जिवंत करता येईल, या आशेवर त्यांनी मृतदेहावर अंतिमसंस्कार केले नाहीत, अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे.
कुरार पोलिसांना सोमवारी रात्री एक गुप्त सूचना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी मालाड येथील एका पॉलिक्लिनिकवर छापा मारला. या क्लिनिकची झडती घेण्यात आली. त्यावेळी फ्रीजरमध्ये एका बुजुर्ग व्यक्तीचा मृतदेह मिळाला. विशेष म्हणजे गेल्या एक महिन्यापासून दुरुस्तीसाठी हे क्लिनिक बंद होतं. या घटनेची माहिती समोर आल्यानंतर संबंधित यंत्रणांनी प्रकरणाची दखल घेतली असून, मृतदेह इतका काळ फ्रीजरमध्ये ठेवण्यामागील नेमकी परिस्थिती काय होती, याचा शोध घेतला जात आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.