Shubman Gill Net Worth: भारतीय क्रिकेटचा तरुण स्टार शुभमन गिल आज केवळ मैदानावरच नव्हे, तर व्यवसाय आणि ब्रँडिंगच्या जगातही आपला ठसा उमटवत आहे. वयाच्या केवळ 25 व्या वर्षी गिलने आपल्या खेळाने आणि व्यक्तिमत्त्वाने करोडो चाहत्यांची मने जिंकली असून, तो आता भारतातील सर्वात महागडा आणि लोकप्रिय ब्रँड चेहरा बनला आहे. न्यूज18 च्या अहवालानुसार, वरिष्ठ क्रीडा विश्लेषक नीरज झा यांच्या म्हणण्यानुसार शुभमन गिलची ब्रँड व्हॅल्यू काही महिन्यांत तब्बल 40 टक्क्यांनी वाढली आहे. त्यांच्या मते, शुभमनच्या एंडोर्समेंट फीमध्ये आता 25 टक्के ते 50 टक्के पर्यंत वाढ झाली आहे. पूर्वी दरमहा त्याला 3 ते 4 ब्रँड ऑफरर्स मिळत असत, पण आता ही संख्या वाढून 10 ते 15 पर्यंत पोहोचली आहे. यावरून त्याची मार्केटमधील मागणी स्पष्ट होते.
उद्योग क्षेत्रातील सूत्रांच्या माहितीनुसार, शुभमन गिल सध्या प्रत्येक ब्रँड डीलसाठी दरवर्षी 4 ते 5 कोटी आकारतो. येत्या काळात ही रक्कम वाढून 6 ते 8 कोटी पर्यंत पोहोचू शकते. आयओएस स्पोर्ट्सचे सीईओ नीरव तोमर यांनी सांगितले की, 'शुभमन गिल हळूहळू मार्केटर्ससाठी नवीन विराट कोहली म्हणून उदयास येत आहे.' गिल सध्या अनेक जागतिक कंपन्यांचा ब्रँड अॅम्बेसेडर आहे. ज्यात MRF, Oakley, Coca-Cola, आणि Casio सारख्या नामांकित कंपन्यांचा समावेश आहे. 2023 मध्ये शुभमनकडे 8 ब्रँड एंडोर्समेंट्स होत्या, तर 2024 मध्ये ही संख्या दुप्पट वाढून 16 वर पोहोचली. मागील वर्षी त्याने केवळ एंडोर्समेंट्समधून सुमारे 40 कोटी कमावल्याचा अंदाज आहे.
हेही वाचा - Asia Cup Trophy Controversy : मोहसिन नक्वी यांना गमवावी लागणार नोकरी?; भारताकडून आशिया कप ट्रॉफी हिसकावल्याबद्दल होऊ शकते शिक्षा
लेगसी स्पोर्ट्सचे सीईओ अमितेश शाह यांच्या मते, शुभमनची ब्रँड व्हॅल्यू लवकरच आणखी 40 टक्क्यांनी वाढू शकते. त्यांनी सांगितले की त्याचा तरुण चाहता वर्ग, मैदानावरील सातत्यपूर्ण कामगिरी आणि मजबूत सोशल मीडिया उपस्थिती हे त्याच्या यशाचे मुख्य घटक आहेत. तथापि, शुभमन गिलचे प्राथमिक उत्पन्न अजूनही क्रिकेटमधूनच येते. बीसीसीआयसोबतच्या Grade A करारानुसार तो दरवर्षी 7 कोटी कमावतो. याशिवाय, तो आयपीएलमधील सर्वाधिक मानधन घेणाऱ्या खेळाडूंमध्ये असून, गुजरात टायटन त्याला प्रत्येक हंगामात तब्बल 16.5 कोटी देते. त्याचे मासिक उत्पन्न 50 लाखांपेक्षा अधिक आहे, तर क्रिकेट आणि जाहिरातींमधून त्याची वार्षिक कमाई 30 ते 40 कोटी दरम्यान असल्याचे सांगितले जाते.
हेही वाचा - IPL Auction 2026 : डिसेंबरमध्ये होणार IPL 2026 साठीचा लिलाव?; खेळाडूंना कायम ठेवण्याची अंतिम मुदत निश्चित
शुभमन गिलची एकूण संपत्ती
गिलची एकूण संपत्ती सध्या अंदाजे 34 कोटी आहे. त्याच्याकडे प्रभावी कार कलेक्शन असून त्यामध्ये Range Rover Velar, Mercedes-Benz E350, आणि Mahindra Thar यांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, आनंद महिंद्रा यांनी त्याच्या उत्कृष्ट कामगिरीसाठी त्याला महिंद्रा थार भेट दिली होती. आज शुभमन गिल केवळ एक क्रिकेटर नाही, तर तो भारतातील तरुणांसाठी एक प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व बनला आहे. पंजाबच्या एका साध्या घरातून सुरू झालेली त्याची कहाणी आता 'क्रिकेटचा राजकुमार' या नावाने इतिहासात नोंदली गेली आहे.