देशातील सर्वात श्रीमंत महापालिका म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेने (BMC) आपल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट दिली आहे. या वर्षी महापालिकेकडून कर्मचाऱ्यांना तब्बल 33,000 रुपये सानुग्रह अनुदान (दिवाळी बोनस) म्हणून देण्यात येणार आहेत. या महत्त्वपूर्ण निर्णयामुळे पालिकेतील 83,000 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची दिवाळी अधिक गोड आणि उत्साहाची होणार आहे. महापालिका मुख्यालयात आयोजित सर्व गटनेत्यांच्या उच्चस्तरीय बैठकीत या बोनसच्या रकमेवर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आल्याची माहिती कामगार संघटनेच्या प्रतिनिधींनी दिली.
खाजगी शाळांतील शिक्षकांसह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही मिळणार लाभ
मुंबई महापालिकेने जाहीर केलेला 33,000 रुपयांचा हा बोनस गेल्या वर्षी दिलेल्या 31,000 रुपयांपेक्षा 2,000 रुपयांनी जास्त आहे. या निर्णयाची व्याप्ती केवळ पालिकेच्या कर्मचाऱ्यांपुरती मर्यादित नसून, महापालिकेच्या अनुदानित खाजगी प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनाही हाच बोनस दिला जाणार आहे. याशिवाय, शिक्षण सहाय्यक आणि महापालिकेच्या शैक्षणिक सेवांशी जोडलेल्या कर्मचाऱ्यांनाही या सानुग्रह अनुदानाचा थेट लाभ मिळणार असल्याने कर्मचारी वर्गात आनंदाचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा – केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळी भेट! महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची वाढ; आता 63 टक्के मिळणार DA
केंद्र सरकारकडून ‘डीए’ वाढ
दिवाळीच्या पार्श्वभूमीवर इतर सरकारी क्षेत्रांतील कर्मचाऱ्यांसाठीही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. केंद्र सरकारने नुकतीच आपल्या कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात (DA) आणि पेन्शनधारकांच्या महागाई सवलतीत 3 टक्क्यांची वाढ केली असून, आता हा भत्ता 63 टक्के झाला आहे. दुसऱ्या बाजूला, भारतीय रेल्वेने आपल्या सर्व अराजपत्रित कर्मचाऱ्यांसाठी 78 दिवसांच्या उत्पादकता-आधारित बोनसला (PLB) मंजुरी दिली आहे. यामुळे आगामी सणासुदीच्या काळात सरकारी आणि निमसरकारी कर्मचाऱ्यांच्या हातात मोठी रक्कम जमा होणार आहे.