पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबई इंडियन्सने आगामी 2026 च्या हंगामासाठी आपल्या कोचिंग स्टाफमध्ये आमूलाग्र बदल केले आहेत. संघ व्यवस्थापनाने जुन्या प्रशिक्षकांना निरोप देत नव्या दिग्गजांवर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. या मोठ्या फेरबदलात भारताचा माजी धडाकेबाज फलंदाज रॉबिन उथप्पा याची मुंबई इंडियन्सच्या फलंदाजी प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. आयपीएलमध्ये दीर्घ काळ खेळाडू म्हणून चमकदार कामगिरी करणाऱ्या उथप्पाची प्रशिक्षक म्हणून ही पहिलीच नवी इनिंग असणार आहे.
नवीन मुख्य प्रशिक्षकासह ताफ्याला मिळाले बळ
यापूर्वीच मुंबई इंडियन्सने वेस्ट इंडिजचा अष्टपैलू खेळाडू कायरन पोलार्ड याच्याकडे मुख्य प्रशिक्षकपदाची धुरा सोपवली असून, त्याने महेला जयवर्धनेची जागा घेतली आहे. आता पोलार्डसोबत रॉबिन उथप्पाची जोड मिळाल्यामुळे मुंबईचा सपोर्ट स्टाफ अधिक मजबूत झाला आहे. या नव्या कोचिंग टीमच्या नेतृत्वाखाली मुंबई इंडियन्स आगामी मोसमात कशी कामगिरी करून दाखवते, याकडे सर्व क्रिकेटप्रेमींचे लक्ष लागले आहे.
गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागातही नवे चेहरे
मुंबई इंडियन्सने फलंदाजीसोबतच गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण विभागातही अनुभवी खेळाडूंना संधी दिली आहे. न्यूझीलंडचा माजी वेगवान गोलंदाज मिचेल मॅक्लेनघन याची लसिथ मलिंगाच्या जागी गोलंदाजी प्रशिक्षक म्हणून निवड करण्यात आली आहे. तर भारतीय राष्ट्रीय संघाचे माजी क्षेत्ररक्षण प्रशिक्षक टी. दिलीप यांच्याकडे क्षेत्ररक्षणाची धुरा सोपवण्यात आली आहे. याशिवाय, मुंबईचा माजी वेगवान गोलंदाज धवल कुलकर्णी याच्याकडे ‘डेव्हलपमेंट बॉलिंग कोच’ म्हणून विशेष जबाबदारी देण्यात आली आहे.
रॉबिन उथप्पाची मुंबईच्या ताफ्यात पुनरागमन
रॉबिन उथप्पाने आयपीएल कारकिर्दीत मुंबई इंडियन्ससह कोलकाता नाईट रायडर्स, रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू, राजस्थान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्स यांसारख्या 6 प्रमुख संघांचे प्रतिनिधित्व केले आहे. 2008 मधील पहिल्याच आयपीएल हंगामात उथप्पा मुंबई इंडियन्स संघाचा भाग होता. आता तब्बल 18 वर्षांनंतर तो पुन्हा एकदा मुंबईच्या ताफ्यात परतला आहे. खेळाडू ऐवजी फलंदाजी प्रशिक्षक म्हणून त्याची ही पहिलीच भूमिका असल्याने या नव्या जबाबदारीत तो कशी छाप पाडतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.