वडाळ्यात भररस्त्यात 3 राऊंड फायरिंग! पोलिसांची धडक कारवाई, एका तासात दोघे अटकेत

मुंबईतील वडाळा पश्चिम येथे झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी एका तासात दोन आरोपींना अटक केली.

वडाळ्यात भररस्त्यात 3 राऊंड फायरिंग! पोलिसांची धडक कारवाई, एका तासात दोघे अटकेत

मुंबई : मुंबईतील वडाळा पश्चिम परिसरात झालेल्या गोळीबार प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत दोन आरोपींना अटक केली आहे. आरोपींकडून दोन पिस्तूल, त्यापैकी एक देशी कट्टा आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले आहे. गोळीबाराच्या घटनेनंतर अवघ्या एका तासात पोलिसांनी ही कारवाई केल्याची माहिती समोर आली आहे.

ओला कारमधून आलेल्या आरोपींकडून गोळीबार

वडाळा पश्चिम येथील एसआयडब्ल्यूएस कॉलेजजवळील चार रस्ता परिसरातील आर. ए. किदवाई रोडवर ही घटना घडली. ओला कारमधून आलेल्या आरोपींनी एका व्यक्तीला लक्ष्य करत तीन राऊंड गोळीबार केला. मात्र, संबंधित व्यक्तीने प्रसंगावधान राखत घटनास्थळावरून पळ काढला. त्यामुळे या गोळीबारात त्याला कोणतीही गोळी लागली नाही.

एका तासात दोन आरोपींना अटक

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन डीसीपी झोन-४ अनुराग जैन आणि अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शिवाजी पावडे यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला.

अँटॉप हिल पोलीस ठाण्याचे एटीसी अधिकारी केदार उमटे आणि गुंडा विरोधी पथकाचे अधिकारी गौरव शिंदे यांनी तातडीने तपासाची चक्रे फिरवली. अवघ्या एका तासात दोन संशयितांना शस्त्रांसह ताब्यात घेण्यात आले. पुढील कारवाईसाठी त्यांना माटुंगा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

गोळीबारामागील कारणाचा शोध सुरू

सूत्रांच्या माहितीनुसार, या प्रकरणात अंजा खान, अली उर्फ दाऊद खान आणि सोहेब अशी संशयितांची नावे समोर आली आहेत. त्यापैकी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. संशयितांपैकी काही जण वडाळा आणि वडाळा टीटी परिसरातील रहिवासी असल्याचे सांगितले जात आहे. आरोपी आणि पीडित व्यक्ती हे उत्तर प्रदेशातील प्रतापगड येथील रहिवासी असल्याची माहितीही समोर आली आहे.

दरम्यान, गोळीबार नेमका कोणत्या कारणातून झाला, याचा तपास पोलीस करत आहेत. या प्रकरणातील सर्व आरोपींची भूमिका आणि घटनेमागील पार्श्वभूमी तपासानंतर स्पष्ट होणार आहे.

महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी | Maharashtra News Live Update

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number