भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानाची यशस्वी चाचणी

0
148

नवी दिल्ली, २८ मार्च २०२४, प्रतिनिधी : भारतीय बनावटीच्या एलसीए तेजस मार्क – १ ए (LCA Tejas Mark-1A) या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानाची पहिली यशस्वी चाचणी घेण्यात आली. पहिल्यांदा देशात भारतीय बनावटीच्या लढाऊ विमानाची चाचणी झाली. बंगळुरू येथील हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेडच्या धावपट्टीवरून विमानाने उड्डाण केले. पहिल्या चाचणीसाठी विमान पंधरा मिनिटे आकाशात होते.

भारतीय हवाई दलात एलसीए तेजस मार्क – १ ए या लढाऊ विमानाचा समावेश करण्यात आला आहे. हवाई दलासाठी हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड एलसीए तेजस मार्क – १ ए विमानांची निर्मिती करत आहे. या निर्मिती प्रक्रियेचा भाग म्हणून तयार केलेल्या विमानांपैकी पहिल्या विमानाची एक चाचणी बंगळुरूत घेण्यात आली. हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड भारतीय हवाई दलासाठी ८३ एलसीए तेजस मार्क – १ ए लढाऊ विमानांची निर्मिती करणार आहे.

हलक्या वजनाच्या लढाऊ विमानाचा प्रकल्प १९८३ मध्ये सुरू झाला. पण अनेक वर्ष या प्रकल्पाची विशेष प्रगती झाली नव्हती. अखेर २००१ मध्ये वाजपेयी सरकारच्या काळात पहिल्या हलक्या वजनाच्या लढाऊ विमानाने उड्डाण केले. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर पुढील प्रक्रियेला सुरुवात झाली. वाजपेयी सरकारने २००३ मध्ये या विमानाला तेजस असे नाव दिले. यानंतर २००७ मध्ये हवाई दलासह भारताच्या नौदलासाठीही लढाऊ विमानांच्या प्रकल्पावर काम सुरू झाले. मोदी सरकारच्या काळात २०१६ मध्ये चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण करणाऱ्या दोन तेजस विमानांचा समावेश भारताच्या हवाई दलात करण्यात आला. यानंतर २०१७ मध्ये हवाई दलासाठी ७३ एलसीए तेजस मार्क – १ ए या लढाऊ विमानांची तसेच दहा प्रशिक्षणासाठीच्या एलसीए तेजस मार्क – १ ए विमानांची खरेदी करण्याचा निर्णय झाला. या करारानुसार विमानांची निर्मिती हिंदुस्तान एअरोनॉटिक्स लिमिटेड करत आहे.

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!