Sunday, May 19, 2024 08:34:39 AM

नाशकात कटकट वाढली

नाशकात कटकट वाढली

नाशिक, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : माजी आमदार जे पी गावित यांनी दिंडोरी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यामुळे दिंडोरीत महाविकास आघाडीची डोकेदुखी वाढल्याचे चित्र आहे. नुकतीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जे पी गावित यांची भेट घेऊन त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला होता. मात्र जे पी गावित हे आपल्या मागणीवर ठाम राहिलेत आणि अखेर त्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. तर दुसरीकडे नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 20 मे रोजी पार पडणार आहे. या पार्श्वभूमीवर नामनिर्देशन पत्र दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. अद्याप महायुतीचा इथं उमेदवार ठरत नाही आहे त्यातच नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले शांतीगिरी महाराज यांनी पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे…

उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी नाशिकच्या रस्त्यावर पुन्हा एकदा लाल वादळ परतले. मात्र यावेळी कुठल्याही मोर्चा आंदोलनासाठी नाही तर माजी आमदार जे पी गावीत यांचा उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लाल वादळ नाशिकमध्ये दाखल झाले. ज्या रस्त्यावर ठिय्या आंदोलन केले होते. त्याच ठिकाणाहून जिल्हाधिकारी कार्यालयात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी माकप पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

काही दिवसांपासून दिंडोरी लोकसभा मतदारसंघ राज्यभरात चर्चेचा विषय बनला आहे. दिंडोरीची जागा माकपला सोडावी, अशी मागणी माकपने केली होती. मात्र महाविकास आघाडीत ही जागा शरद पवार गटाच्या वाट्याला आली. राष्ट्रवादी शरद पवार गटाने दिंडोरी लोकसभेसाठी भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहीर केली. मात्र भास्कर भगरे हे उमेदवार बदलावेत, अन्यथा त्यांना पडणारच, असा इशारा जे पी गावित यांनी शरद पवारांना दिला होता. त्यांनतर काहीही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने गावित यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला…

नाशिक लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असलेले शांतीगिरी महाराज यांनी पहिल्याच दिवशी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. शांतीगिरी महाराज हे महायुतीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते. यासाठी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेटदेखील घेतली होती. महायुतीतून शांतीगिरी महाराज निवडणूक लढवणार, अशी चर्चा काही दिवसांपूर्वी सुरु होती. मात्र शांतीगिरी महाराजांचे नाव मागे पडले. यानंतर शांतीगिरी महाराजांनी नाशिकमधून अपक्ष लोकसभा निवडणूक लढवण्याचा निर्धार केला. निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याआधी त्यांनी आठ दिवसांचे अनुष्ठान देखील केले होते. अनुष्ठानाच्या सांगतेवेळी त्यांनी त्र्यंबकेश्वर येथे जोरदार शक्तीप्रदर्शन केले. त्यानंतर नाशिक शहरात बाबाजी परिवाराकडून बाईक रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यात एक हजाराहून अधिक बाईक घेऊन त्यांचा भक्त परिवार सहभागी झाला होता. आज अखेर शांतीगिरी महाराजांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. ते नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवणार आहेत.

नाशिक लोकसभा मतदारसंघाची निवडणूक 20 मे रोजी होणार आहे. या पार्श्वभूमीवर शुक्रवारपासून नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या प्रक्रियेस सुरुवात करण्यात आली आहे. शुक्रवारी महायुतीतून छगन भुजबळांचे निकटवर्तीय दिलीप खैरे, शिउबठा गटाचे महानगर प्रमुख विलास शिंदे यांनीदेखील उमेदवारी अर्ज घेतला आहे. यापाठोपाठ नाशिकचे शिवसेना शिंदे गटाचे खासदार हेमंत गोडसे यांनीही महायुतीत नाशिकच्या जागेचा उमेदवार ठरलेला नसताना उमेदवारी अर्ज घेतला आहे. नाशिकच्या जागेवरून महायुतीत अद्याप तिढा कायम असल्याचे चित्र आहे. उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात झाली असली तर नाशिकच्या जागेसाठी अजूनही महायुतीचा उमेदवार ठरलेला नाही. तर दुसरीकडे नाशिक लोकसभेसाठी शिउबठा गटाकडून राजाभाऊ वाजे यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. महायुतीचा नाशिकच्या अद्याप निर्णय झाला नसताना गोडसे यांनी उमेदवारी अर्ज घेतल्याने नक्की गोडसेंच्या मनात चाललंय तरी काय? असा प्रश्न आता उपस्थित होत आहे.

गुरुवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी नाशिकची जागा शिवसेनाच लढवणार, असे वक्तव्य केले. यापाठोपाठ शिवसेना नेते संजय शिरसाट यांनी देखील नाशिकची जागा 100 टक्के शिवसेनेलाच मिळणार, असा दावा केला आहे. हेमंत गोडसे यांची निवडूक लढवण्याची तयारी असतानाच शिवसेनाचे नाशिक जिल्हाप्रमुख अजय बोरस्ते यांनीही निवडणूक लढवण्याची तयारी दर्शवली आहे. त्यामुळे आता नाशिकची जागा शिवसेनेलाच सुटणार का? नाशिकमधून नक्की कुणाला उमेदवारी मिळणार? हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत नवा ट्विस्ट पाहायला मिळत असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार माणिकराव कोकाटे यांचे नाव आता पुढे आले आहे. माणिकराव कोकाटे सिन्नरचे आमदार असून त्यांना राष्ट्रवादीकडून लोकसभेच्या मैदानात उतरवले जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात सुरू आहे. शिवसेनेचे नेते आणि विद्यमान खासदार हेमंत गोडसें आपली उमेदवारी पक्की समजत असतानाच राष्ट्रवादी काँग्रेसने पुन्हा एकदा मतदारसंघावर दावा केला आहे. त्यामुळे, नाशिकच्या जागेवरुन महायुतीत अजूनही संघर्ष सुरूच असल्याचे दिसून येते.


सम्बन्धित सामग्री