नुकतीच नालासोपाऱ्यातून एक धक्कादायक बातमी समोर आली होती. नालासोपाऱ्यात हिंदू तरुणींना प्रेमाच्या जाळ्यात ओढून अश्लील व्हिडिओ बनवल्याचा आरोपात आरीफ आयुब शेख या 22 वर्षीय तरुणाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. ही घटना ताजी असतानाच आता नाशिकच्या उपनगर पोलिसात अल्पवयीन मुलीचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी आणि धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकल्याप्रकरणी तरुणावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नाशिकमध्ये एका 13 वर्षीय अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटक करून तिच्यावर धर्मांतर करण्यासाठी सातत्याने दबाव आणल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यावेळी आरोपी नोमाण अन्सारी या तरुणाने पीडित मुलीला नमाज पठनासह हिजाब घालण्यास प्रवृत्त केले. तसेच अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून या सर्व प्रकारांचे फोटो व व्हिडीओ आरोपीने स्वतःच्या मोबाईलमध्ये शूट केले होते.
त्यानंतर पीडितेला फोटो व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देखील दिली. यावेळी “तुमच्या मुलीशी लग्न करून तिला दिल्लीला घेऊन जाईन आणि तिचे धर्मांतर करेन. जर तुम्ही विरोध केला, तर तुम्हालाही धर्मांतर करावे लागेल, अन्यथा सर्व फोटो आणि व्हिडीओ इंटरनेटवर व्हायरल करेन,” अशी धमकी देत तिच्या कुटुंबीयांवरही धर्मांतरण करण्यासाठी दबाव टाकल्याचे तक्रारीत नमूद आहे. या घटनेमुळे नाशिकमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या प्रकरणी पीडित मुलीच्या कुटुंबाच्या तक्रारीवरून नाशिकच्या उपनगर पोलीस ठाण्यात गंभीर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी आरोपीला मालेगाव येथून बेड्या ठोकल्या आहेत.