Ajmer Female Jailer Divya Choudhary Got Arrestted: राजस्थानमधील अजमेर सेंट्रल जेलमध्ये तैनात असलेल्या 37 वर्षीय महिला जेलर दिव्या चौधरी यांना एका विचित्र प्रकरणामुळे अखेर गजाआड जावे लागले आहे. ज्या अजमेर मध्यवर्ती कारागृहाची सुरक्षा आणि शिस्त राखण्याची जबाबदारी त्यांच्यावर होती, त्याच तुरुंगात त्यांना आता कैदी म्हणून ठेवण्यात आले आहे. आपल्या दोन लहान मुलींची देखभाल करण्यासाठी आणि घरकामाच्या मदतीसाठी दोन महिला कैद्यांना बेकायदेशीरपणे तुरुंगाबाहेर नेण्याचा प्रयत्न केल्याचा गंभीर आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार, कौटुंबिक आणि नोकरीचा ताण सांभाळण्यासाठी त्यांनी हे कृत्य केल्याचे उघडकीस आले आहे.
12 जुलै रोजी तुरुंगाच्या मुख्य प्रवेशद्वारावर नाट्यमय घडामोडी
ही संपूर्ण घटना 12 जुलै रोजी घडली, जेव्हा जेलर दिव्या चौधरी यांनी आपली सहकारी महिला कॉन्स्टेबल सोनिया चौधरी यांच्या मदतीने दोन महिला कैद्यांना तुरुंगाबाहेर नेण्याचा प्रयत्न केला. यामध्ये जन्मठेपेची शिक्षा भोगत असलेली किरण उर्फ सेठा आणि न्यायालयीन कोठडीत असलेली सना या दोन कैद्यांचा समावेश होता. या दोन्ही कैद्यांना मुख्य प्रवेशद्वारावरून बाहेर नेताना सुरक्षेवर तैनात असलेल्या कर्मचाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवला. कर्मचाऱ्यांचा विरोध डावलून त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न दिव्या यांनी केला. या घटनेनंतर तुरुंग प्रशासनाने तात्काळ अंतर्गत चौकशीचे आदेश दिले होते.
अंतर्गत चौकशीत दोषी आढळल्यानंतर 5 ऑगस्टला गुन्हा दाखल
अजमेरचे डीएसपी शिवम जोशी यांनी दिलेल्या माहितीनुसार, दिव्या चौधरी यांच्या दोन्ही मुली खूप लहान असल्याने घर साफसफाई आणि सांभाळासाठी त्यांना मदतीची गरज होती. चौकशीदरम्यान दोन्ही महिला कैदी सुमारे 1 ते 2 तासांत परत तुरुंगात आल्याचे निष्पन्न झाले. मात्र, नियमांचे उल्लंघन झाल्याचे अंतर्गत चौकशीत सिद्ध झाल्यानंतर 05 ऑगस्ट रोजी अजमेरच्या सिव्हिल लाईन्स पोलीस ठाण्यात एफआयआर (FIR) दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच दिव्या चौधरी फरार झाल्या, ज्यामुळे त्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पोलीस पथक तैनात करण्यात आले.
हेही वाचा – धुळे सिव्हिलमध्ये रुग्णांची हेळसांड? डोक्यातून रक्तस्राव होत होता, तरी 19 तास उपचार नाही; नेमकं काय घडलं?
सायबर सेलच्या मदतीने 6 ऑक्टोबरला कोट्यातून अटक
फरार झालेल्या जेलरचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक पुरावे आणि सायबर सेलची मदत घेतली. अखेर 06 ऑक्टोबर रोजी अजमेर पोलिसांच्या विशेष पथकाने कोटा जिल्ह्यातील एका भाड्याच्या फ्लॅटवर छापा टाकून दिव्या चौधरी यांना ताब्यात घेतले. त्यांचे पतीदेखील जेलर असून ते सध्या कोट्यात कार्यरत आहेत. मोबाईल लोकेशनच्या आधारे त्या पतीच्या फ्लॅटवर लपून राहिल्याचे स्पष्ट झाले आणि पोलिसांनी तेथूनच त्यांना बेड्या ठोकल्या.
नियमांचे उल्लंघन अन् कर्मचाऱ्यावर ढकलले खापर
पोलीस चौकशीदरम्यान दिव्या चौधरी यांनी असा दावा केला की, त्यांनी महिला कॉन्स्टेबल सोनियाला ओपन जेलमधील कैद्यांना आणण्यास सांगितले होते, कारण ओपन जेलमधील कैद्यांना बाहेर जाण्यास कायदेशीर परवानगी असते. मात्र सोनियाने इतर दोन नियमीत महिला कैद्यांना आणल्याचे सांगत त्यांनी आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. राजस्थान कारागृह नियमांनुसार कैद्यांची कोठडी आणि सुरक्षा सांभाळण्याचे कर्तव्य असलेल्या जेलर दिव्या चौधरी आता स्वतः त्याच अजमेर मध्यवर्ती कारागृहात कैदी म्हणून न्यायालयीन कोठडीत आहेत.
हेही वाचा – राज्यात पुन्हा अग्नितांडव! मुलुंडमध्ये भीषण आग; 6 ते 8 सिलेंडरचे स्फोट, परिसरात खळबळ
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.