आजार बरा करतो, पैशांचा पाऊस पाडतो! महिलेला साडेसात लाखांचा गंडा; नाशिकमध्ये भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अघोरी पूजा करून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका महिलेची साडेसात लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
आजार बरा करतो, पैशांचा पाऊस पाडतो! महिलेला साडेसात लाखांचा गंडा; नाशिकमध्ये भोंदूबाबाविरुद्ध गुन्हा दाखल

नाशिक: नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. अघोरी पूजा करून पैशांचा पाऊस पाडण्याचे आमिष दाखवून एका महिलेची साडेसात लाख रुपयांनी फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी गंगापूर पोलीस ठाण्यात एका भोंदू बाबाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण?
पनवेल येथे राहणाऱ्या एका महिलेला गंभीर आजार होता. याचाच फायदा घेत आरोपी भोंदू बाबा अरुण धोंडू पाटील याने तिला गाठले. तुझा आजार बरा करतो आणि दैवी शक्तीच्या जोरावर घरात पैशांचा पाऊस पाडतो, असे आमिष त्याने महिलेला दाखवले. महिलेचा विश्वास बसावा म्हणून त्याने काही बनावट चमत्कारही करून दाखवले. यानंतर त्याने टप्प्याटप्प्याने महिलेकडून साडेसात लाख रुपये उकळले.

हेही वाचा – अल्पवयीन मुलीची प्रसूती, नवजात बाळाच्या विक्रीचा संशय; महिला डॉक्टर आणि अल्पवयीन प्रियकराविरोधात गुन्हा दाखल

आरोपीने आपले बिंग फुटू नये म्हणून अत्यंत चलाखीने कट रचला. त्याने पीडित महिलेच्या डोळ्यांवर काळी पट्टी बांधून तिला पनवेलहून थेट नाशिक येथे आणले. नाशिकमधील गंगापूर रोडवरील बालाजी मंदिराच्या निर्जन परिसरात त्याने अघोरी पूजाविधीचा घाट घातला.

अर्धनग्न करून अघोरी पूजा, कवटी आणि बळीचा वापर
पीडित महिलेने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपीने तिला अर्धनग्न अवस्थेत बसवून पूजा केली. या अघोरी पूजेसाठी त्याने मानवी कवटीचा वापर केला आणि बोकडाचा बळी दिल्याचा धक्कादायक आरोपही महिलेने केला आहे. पूजा झाल्यानंतर पैशांचा पाऊस पडेल असे सांगण्यात आले होते, मात्र तसे काहीच झाले नाही. आपली फसवणूक झाली असल्याचे लक्षात येताच महिलेने आरडाओरड केली.

(महाराष्ट्राच्या सर्व बातम्या एका क्लिकवर) –

विजयादशमीदिनी महत्त्वाच्या घडामोडी | Dussehra Festival News Live

या घटनेनंतर पीडित महिलेने धीर गोळा करत महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती म्हणजेच अंनिसच्या पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधला. अंनिसच्या मदतीने तिने गंगापूर पोलीस ठाणे गाठून घडलेला सर्व प्रकार सांगितला.

पोलिसांनी या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून तात्काळ आरोपी अरुण धोंडू पाटील याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. त्याच्यावर महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा आणि भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.

 

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version