बॉलिवूड अभिनेता टायगर श्रॉफ याच्या घरावर आणि कार्यालयावर झालेल्या गोळीबार प्रकरणाने संपूर्ण मनोरंजन सृष्टीत मोठी खळबळ उडाली होती. या अत्यंत गंभीर गुन्ह्यानंतर मुंबई पोलिसांनी तातडीने चक्र फिरवत अवघ्या काही तासांतच तिन्ही संशयित आरोपींना जेरबंद करण्यात मोठे यश मिळवले. लॉरेन्स बिश्नोई गँगशी संबंध असल्याचा दावा करणाऱ्या या तिघांना राजस्थानमधील कोटा रेल्वे स्थानकावरून अत्यंत नाट्यमय रीतीने अटक करण्यात आली. या थरारक कारवाईची एक रंजक इनसाईड स्टोरी आता समोर आली असून, पोलिसांच्या कारवाईपासून वाचण्यासाठी आरोपींनी शक्कल लढवली होती, मात्र एका क्षुल्लक चुकीमुळे आणि खाण्याच्या आवडीमुळे ते पोलिसांच्या जाळ्यात अडकले.
परदेशात पाठवण्याचे आमिष अन् सुपारी
पोलिसांच्या कसून चौकशीतून समोर आलेल्या माहितीनुसार, या संपूर्ण कटाचा मास्टरमाइंड अनिल पंडित हा असून त्याने रेहान नावाच्या शूटर्सला टायगर श्रॉफला संपवण्याची सुपारी दिली होती. एवढेच नव्हे तर गुन्हा पूर्ण केल्यानंतर रेहानला सुरक्षितपणे परदेशात पसार करण्याचे मोठे आश्वासनही त्याला देण्यात आले होते. धक्कादायक बाब म्हणजे, हा सर्व गोळीबाराचा खेळ कॅलिफोर्नियातून बसून अनिल पंडित चालवत होता. त्यानेच या गुन्ह्यासाठी लागणारी सर्व प्राणघातक हत्यारे उपलब्ध करून दिली होती आणि प्राथमिक खर्च व ॲडव्हान्स म्हणून अडीच लाख रुपयांची मोठी रक्कमही दिली होती.
रेकी करून रचला होता कट
तपासात असे उघडकीस आले की, या गुन्ह्यातील आरोपींपैकी ऋतिक याच्यावर अभिनेता टायगर श्रॉफच्या निवासस्थानाचे आणि आवाराचे सतत रेकी करण्याची मोठी जबाबदारी सोपवण्यात आली होती. हे सर्व आरोपी गेल्या महिनाभरापासून मुंबईतील एका आलिशान हॉटेलमध्ये अत्यंत आरामात राहत होते. मास्टरमाइंड अनिल पंडित हा त्यांना दैनंदिन खर्चासाठी दररोज 5,000 ते 10,000 रुपये ऑनलाइन पाठवत होता. विशेष म्हणजे, आपली ओळख लपवण्यासाठी हे आरोपी विविध दुकानदारांना ऑनलाइन पैसे पाठवून त्यांच्याकडून रोख कॅश घेत असत.
हेही वाचा – मिरजेच्या गुंडेवाडीत रक्तरंजित थरार! 30 वर्षीय तरुणावर चाकूहल्ला; घटनेने परिसरात खळबळ
शेव खरेदी करताना आरपीएफ जवानांच्या नजरेत आले अन्…
गुन्हा घडल्यानंतर हे आरोपी तातडीने दिल्ली गाठून तिथून नेपाळच्या सीमेवरून पळून जाण्याच्या तयारीत होते. पोलिसांची दिशाभूल करण्यासाठी त्यांनी ट्रेनमधील प्रवासादरम्यान स्वतःचे केस कापले आणि कपडे बदलून वेशभूषा बदलली होती. ते ट्रेनच्या एकाच डब्यात वेगवेगळ्या सीटवर प्रवास करत होते. कोटा रेल्वे स्टेशनवर गाडी पोहोचली असता, एका आरोपीला भूक लागल्याने तो प्लॅटफॉर्मवर शेव खरेदी करण्यासाठी खाली उतरला. मुंबई पोलिसांनी पुरवलेल्या छायाचित्रांच्या आधारे रेल्वे सुरक्षा दलाच्या (RPF) सतर्क जवानांनी त्याला तात्काळ ओळखले. जवान थेट डब्यात शिरले आणि त्यांनी केलेल्या एका साध्या प्रश्नावर आरोपी गाफील राहून अडकला आणि तिघांचा डाव फसला.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.