Kalyan Hit And Run News: कल्याण पश्चिम भागातील निकी नगर (गणपती चौक) परिसरात एक अत्यंत संतापजनक आणि दुःखद घटना समोर आली आहे. मॉर्निंग वॉकसाठी घराबाहेर पडलेल्या सुनील कोळी या 25 वर्षीय तरुणाला एका भरधाव मर्सिडीज कारने मागून जोरदार धडक दिली. ही धडक इतकी भीषण होती की सुनील हवेत फेकला जाऊन रस्त्यावर आदळला आणि उपचारापूर्वीच त्याचा जागीच मृत्यू झाला होता. या दुर्घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
सीसीटीव्ही फुटेजमुळे उघडकीस आला प्रकार; गाडीवर आढळला ‘विधानसभा सदस्य’चा स्टिकर
सुनील कोळीचा मृतदेह संशयास्पद स्थितीत आढळल्यानंतर पोलिसांनी तातडीने तपास चक्र वेगाने फिरवले. परिसरातील सीसीटीव्ही (CCTV) फुटेजची पाहणी केली असता, एका भरधाव मर्सिडीज कारने सुनीलला उडवल्याचे स्पष्ट झाले. विशेष म्हणजे, ज्या मर्सिडीज कारने हा अपघात घडवला, त्या गाडीच्या काचेवर ‘विधानसभा सदस्य’ (MLA) असे लिहिलेले स्टिकर आढळून आले. त्यामुळे ही गाडी नेमकी कुठल्या आमदाराची आहे की त्या स्टिकरचा गैरवापर केला जात होता, याविषयी आता राजकीय वर्तुळात मोठी चर्चा रंगली आहे.
हेही वाचा – प्रेयसीसाठी धर्मांतर केलं, पण भररस्त्यात तिचाच जीव घेतला! नवी मुंबईत नेमकं काय घडलं?
खडकपाडा पोलिसांकडून गुन्हा दाखल; कारचालक कोमिल गायकर अटकेत
या गंभीर हिट अँड रन प्रकरणाची गंभीर दखल घेत खडकपाडा पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला. पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत मर्सिडीज चालवणाऱ्या कोमिल गायकर या आरोपीला अटक केली आहे. पोलीस आता या मर्सिडीज कारची अधिकृत मालकी कोणाकडे आहे, गाडीवरील स्टिकर वैध होते की नाही तसेच इतर तांत्रिक कागदपत्रांची कसून पडताळणी करत आहेत.
व्हीआयपी स्टिकर्सच्या गैरवापराचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर; नागरिकांची कठोर कारवाईची मागणी
या दुर्दैवी घटनेमुळे वाहनांवर लावले जाणारे व्हीआयपी आणि लोकप्रतिनिधींचे स्टिकर्स आणि त्यांचा होणारा गैरवापर पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. भरधाव मर्सिडीज चालकाच्या बेजबाबदारपणामुळे एका निष्पाप तरुणाचा नाहक जीव गेल्याने स्थानिकांमध्ये तीव्र रोष आहे. या प्रकरणातील दोषींवर सदोष वध आणि कायदेशीर क्लृप्त्यांचा वापर करणाऱ्यांवर कठोर ते कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी मृताच्या कुटुंबीयांकडून व नागरिकांकडून केली जात आहे.