आंध्र प्रदेशातून एक अत्यंत मन हेलावून टाकणारी दुर्घटना समोर आली आहे. एनटीआर (NTR) जिल्ह्यातील विजयवाडा पश्चिम बायपासवर एका इलेक्ट्रिक कारचा भीषण अपघात झाला. कारचालकाचे नियंत्रण सुटल्याने ही वाहणारी कार रस्त्याच्या दुभाजकाला (डिव्हायडरला) जोरदार धडकली. या धडकेची तीव्रता इतनी जास्त होती की काही क्षणातच या इलेक्ट्रिक कारला भीषण आग लागली. या दुर्दैवी आगीत कारमधील 4 जणांचा जागीच जळून मृत्यू झाला, तर अन्य एक व्यक्ती गंभीर जखमी झाली असून तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
कौटुंबिक कार्यक्रमावरून घरी परतत असताना काळाचा घाला
कारमधील सर्व प्रवासी हे नंबुरू येथील एका कौटुंबिक सोहळ्यात सहभागी झाल्यानंतर आपल्या घरी परतत होते. वाटेत हा दुर्दैवी अपघात घडला. या भीषण दुर्घटनेत प्राण गमावलेल्यांमध्ये 39 वर्षीय कोमारेड्डी रामदेव (न्युन्ना भागातील रहिवासी), त्यांची आई अरुणा, नंबुरू येथील निवासी टिगुरु विजया आणि एका लहान मुलाचा समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलिसांनी आणि अग्निशामक दलाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली, परंतु तोपर्यंत कार पूर्णपणे जळून खाक झाली होती. जखमी झालेल्या एका व्यक्तीची प्रकृती अद्याप अत्यंत चिंताजनक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.
सोशल मीडियावर घटनेचे व्हिडिओ व्हायरल
या भीषण अपघाताचे काही व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. व्हायरल झालेल्या एका क्लिपमध्ये चालत्या इलेक्ट्रिक कारमधून धुराचे प्रचंड लोट बाहेर पडताना दिसत आहेत, तर काही अंतरावर मृतदेह पडल्याचे दृश्य अंगावर काटा आणणारे आहे. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली असून हळहळ व्यक्त होत आहे.
हेही वाचा – पुन्हा एकदा देशव्यापी आंदोलनाचा एल्गार; 23 ऑक्टोबरला प्रत्येक जिल्हा मुख्यालयावर…
आसाममधील अशाच एका अपघाताची पुनरावृत्ती
यापूर्वी गेल्या महिन्यात आसाममधील नागाव जिल्ह्यात असाच एक हृदयद्रावक अपघात घडला होता. अरुणाचल प्रदेशहून गुवाहाटीच्या दिशेने जाणाऱ्या एका कारला पुराना गुडम भागातील केनापट्टी येथे भीषण अपघात झाला होता. चालकाचे नियंत्रण सुटल्याने ती कार आधी पथदिव्याच्या खांबाला धडकली आणि नंतर अनेक वेळा पलटली. धडकेमुळे त्या कारलाही अचानक आग लागली होती आणि त्या दुर्घटनेत 2 जण जागीच जाळून मृत पावले होते, तर 2 जण गंभीर जखमी झाले होते. रस्ते अपघातांच्या या वाढत्या घटनांमुळे वाहनचालकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.