जैसलमेर : भारत-पाकिस्तान सीमेवर पुन्हा एकदा “युद्ध” सुरू होणार आहे. मात्र यावेळी ते युद्धाभ्यासाच्या रूपात! भारताच्या तीनही सैन्यदलांचे सेना, नौदल आणि हवाईदलाचे संयुक्त लष्करी सराव ‘ऑपरेशन त्रिशूल’ आजपासून सुरू झाले आहे. हा सराव 13 दिवस चालणार असून 10 नोव्हेंबरपर्यंत पार पडेल. या सरावासाठी भारतीय वायुदलाने ‘नोटम’ (Notice to Airmen) जारी केले आहे.
हा भारताच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा संयुक्त युद्धाभ्यास ठरणार असून, यात सुमारे 30000 सैनिकांचा सहभाग असेल. राजस्थानच्या मरुभूमीपासून गुजरातच्या सर क्रीक परिसरापर्यंत हा सराव केला जाईल. या ऑपरेशनचा मुख्य उद्देश म्हणजे तीन्ही दलांमध्ये समन्वय वाढवणे, युनिफाइड ऑपरेशन, डीप स्ट्राइक आणि मल्टी-डोमेन वॉरफेअरची तयारी करणे हा आहे.
या सरावादरम्यान भारतीय सैन्य आपल्या नव्या स्वदेशी शस्त्रास्त्र आणि हायटेक सिस्टम्सची चाचणी घेणार आहे. यात T-90S आणि अर्जुन टँक, हॉवित्झर तोफा, तसेच अपाचे अटॅक हेलिकॉप्टर आणि हेवी लिफ्ट हेलिकॉप्टर यांचा समावेश असेल. सराव जैसलमेरपासून कच्छपर्यंत होणार असून, कच्छच्या किनारी भागात नौदल आणि वायुदलाचे विशेष विमान एकत्र कारवाई करतील, तर थलसेना मरुभूमीत युद्ध कौशल्य दाखवणार आहे.
हेही वाचा: PM Kisan Yojana: आनंदाची बातमी! पीएम किसान योजनेचा पुढचा हप्ता लवकरच तुमच्या खात्यात
मागील काही महिन्यांत पश्चिमी सीमारेषेवर पाकिस्तानकडून वाढलेल्या ड्रोन हालचाली आणि घुसखोरीच्या प्रयत्नांच्या पार्श्वभूमीवर हा सराव महत्त्वाचा मानला जात आहे. त्यामुळे ‘ऑपरेशन त्रिशूल’दरम्यान विशेषतः काउंटर-ड्रोन सिस्टिम, कम्युनिकेशन जॅमिंग तंत्रज्ञान आणि ऑटोमॅटिक स्पेक्ट्रम मॉनिटरिंग सिस्टिम यांची चाचणी घेतली जाणार आहे.
सैन्य सूत्रांनुसार, युद्धाभ्यासासाठी सर्व तयारी पूर्ण झाली असून तीन्ही सैन्यदलांचे वरिष्ठ कमांडिंग ऑफिसर्स प्रत्यक्ष उपस्थित राहून या सरावाचे निरीक्षण करणार आहेत. तसेच रक्षा मंत्री देखील काही दिवसांत सराव स्थळाला भेट देतील, अशी शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
‘ऑपरेशन त्रिशूल’ हा केवळ सराव नसून, तो भारताच्या सैन्य तयारी, तांत्रिक प्रगती आणि रणनीतिक समन्वयाचे प्रदर्शन मानले जात आहे. या सरावामुळे भारताची पश्चिम सीमारेषेवरील संरक्षण क्षमता आणि सज्जता अधिक मजबूत होईल, असा तज्ज्ञांचा विश्वास आहे.
हेही वाचा: Pune University Flyover: युनिव्हर्सिटी चौकातील उड्डाणपूल प्रकल्प पूर्णतेकडे; प्रवाशांना मिळणार दिलासा