Pakistan Smuggling Drugs into India : जम्मूमधील आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानने पुन्हा एकदा ड्रोनचा वापर करून भारतात अंमली पदार्थांची तस्करी करण्याचा प्रयत्न केला आहे. पाकिस्तानस्थित तस्करांचा हा मोठा कट सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पोलिसांनी संयुक्तपणे उधळून लावला. सुरक्षा दलांनी ताब्यात घेतलेल्या पिशव्यांमध्ये पाच किलोहून अधिक हेरॉईन सापडले आहे, ज्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतील किंमत 25 कोटींपेक्षा जास्त असल्याचे सांगण्यात आले. सोमवारी अधिकाऱ्यांनी ही माहिती दिली.
आंतरराष्ट्रीय सीमेवर ड्रोन्सची घुसखोरी
सोमवारी सकाळी सहा वाजता, जम्मू विभागातील आर. एस. पुरा सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेजवळ पाकिस्तानी ड्रोन भारतीय हद्दीत घिरट्या घालताना दिसले. गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या अचूक माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी त्वरित पाऊले उचलली. 'बीएसएफ'च्या प्रवक्त्यांनी सांगितले की, भारतीय हद्दीत आणखी अंमली पदार्थ टाकण्याचा पाकिस्तानस्थित तस्करांचा बेत सुरक्षा दलांनी उधळून लावला.
हेही वाचा - AGTF Arrested Jagga : यूएस-कॅनडा सीमेवर लॉरेन्स बिश्नोई गँगचा सदस्य ताब्यात; बिश्नोई गँगला मोठा धक्का
शोधमोहीम आणि अंमली पदार्थांची जप्ती
ड्रोन दिसल्यानंतर सीमा सुरक्षा दल (BSF) आणि पोलिसांनी आंतरराष्ट्रीय सीमेजवळ जतिंदर चौकी भागातील बिडीपूर गावाजवळ संयुक्तपणे शोधमोहीम राबवली. या शोधमोहिमेत अंमली पदार्थ असलेली पिवळ्या रंगाची दोन पाकिटे सापडली. या दोन पाकिटांमध्ये 10 लहान पाकिटे गुंडाळलेली होती, ज्यांचे एकूण वजन सुमारे 5.3 किलो इतके होते. पोलीस अधिकाऱ्यांनी या प्रकरणी संबंधित कायद्याखाली गुन्हा नोंदवला असून, पुढील तपास सुरू आहे.
हेही वाचा - Rajnath Singh: 'सीमेवर तत्परता वाढवा, कोणत्याही वेळी युद्ध शक्य'; संरक्षणमंत्र्यांचा सैन्य दलांना सूचक इशारा