Sunday, November 16, 2025 11:36:11 PM

Telangana Accident: हैद्राबाद - विजापूर महामार्गावर भीषण अपघात; ट्रक - आरटीसी बस समोरासमोर धडकली; मृतांची संख्या 20 वर

पोलिसांनी सांगितलं की मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, कारण काही प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस, आरटीसी अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले.

telangana accident हैद्राबाद - विजापूर महामार्गावर भीषण अपघात ट्रक - आरटीसी बस समोरासमोर धडकली मृतांची संख्या 20 वर

हैदराबाद: तेलंगणातील रंगा रेड्डी जिल्ह्यात सोमवारी सकाळी झालेल्या भीषण अपघाताने संपूर्ण राज्य हादरले आहे. हैद्राबाद - विजापूर महामार्गावर एक वेगवान दगडांनी भरलेला ट्रक प्रवाशांनी गच्च भरलेल्या आरटीसी बसवर धडकला. या भीषण धडकेत किमान 20 जणांचा जागीच मृत्यू झाला असून अनेक प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत. बसमध्ये सुमारे 70 प्रवासी होते, ज्यात महिला, विद्यार्थी आणि कार्यालयात जाणारे कर्मचारी यांचा समावेश होता. ही दुर्घटना चेवेला मंडलातील मिर्जागुडा गावाजवळ घडली. तंदूर डेपोची बस हैद्राबादकडे जात असताना समोरून येणाऱ्या ट्रकचा तोल गेला आणि ट्रक थेट बसवर आदळला. धडक इतकी जबरदस्त होती की ट्रकवरील दगडांचा लोड बसवर कोसळला आणि अनेक प्रवासी त्याखाली दाबले गेले. काही क्षणांतच घटनास्थळी आरडाओरडा, गोंधळ आणि भीषण दृश्य निर्माण झाले. स्थानिक नागरिक आणि पोलिसांनी तातडीने मदतकार्य सुरू केले. तीन जेसीबी मशीनच्या सहाय्याने मलबा हटवण्यात आला आणि अडकलेल्यांना बाहेर काढण्यात आले.

अपघातात बसचालक आणि ट्रकचालक दोघांचाही मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये अनेक महिला आणि एक 10 महिन्यांचं बाळ असल्याची माहिती मिळाली आहे. जखमी प्रवाशांना तत्काळ चेवेला सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं, तर गंभीर जखमींना अधिक उपचारासाठी हैद्राबादमधील विविध रुग्णालयांत हलवण्यात आलं. पोलिसांनी सांगितलं की मृतांचा आकडा आणखी वाढू शकतो, कारण काही प्रवाशांची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलिस, आरटीसी अधिकारी आणि बचाव पथक घटनास्थळी दाखल झाले. बचाव कार्यादरम्यान चेवेला पोलिस ठाण्याचे निरीक्षक भूपाल श्रीधर हेही जखमी झाले असून त्यांनाही रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.

हेही वाचा: Unique Station India: आता व्हिसाची कटकट विसरा; 'या ' स्टेशनवर उतरलं की काही मिनिटांतच परदेशात प्रवेश

परिवहन मंत्री पोनम प्रभाकर यांनी आरटीसी व्यवस्थापकीय संचालक नागी रेड्डी यांच्याशी संवाद साधून अपघाताचे नेमके कारण जाणून घेतले. त्यांनी रंगा रेड्डी जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांना सर्व जखमींना योग्य वैद्यकीय मदत मिळावी याची खात्री करण्याचे आदेश दिले आहेत.

मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांनी या घटनेवर तीव्र दु:ख व्यक्त केलं आणि मुख्य सचिव के. रामकृष्णा राव तसेच पोलीस महासंचालक बी. शिवधर रेड्डी यांना तात्काळ बचावकार्य आणि वैद्यकीय मदतीच्या सूचना दिल्या. त्यांनी सर्व जखमींना तातडीने हैद्राबादच्या रुग्णालयात हलवण्याचे आणि कोणतीही निष्काळजीपणा होऊ न देण्याचे आदेश दिले. मुख्यमंत्र्यांनी मंत्र्यांना आणि वरिष्ठ अधिकाऱ्यांना घटनास्थळी पोहोचून परिस्थितीवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. या दुर्घटनेनंतर हैद्राबाद - विजापूर महामार्गावर वाहतुकीचा खोळंबा झाला होता. पोलिसांच्या प्राथमिक चौकशीनुसार, ट्रकचालकाने वेगावर नियंत्रण गमावल्यामुळे ही टक्कर झाली. सध्या पोलिसांनी प्रकरण नोंदवून तपास सुरू केला आहे. या भीषण अपघाताने परिसरात शोककळा पसरली आहे.

हेही वाचा: Kokan Railway: रेल्वे प्रशासनाचा दिलासा: सिंधुदुर्ग आणि कणकवली येथे आठ गाड्यांना नवे थांबे मिळाले


सम्बन्धित सामग्री