छत्रपती संभाजीनगर पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणीच्या तिसऱ्या फेरीअखेर डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी 13,163 मतांची आघाडी घेतली आहे. त्यांना 73,931 मते मिळाली असून, प्रतिस्पर्धी सतीश चव्हाण यांना 60,768 मते मिळाली आहेत. रविराज साबळे पाटील यांना 19,835, तर दिलीप घुगे यांना 8,439 मते मिळाली आहेत. आतापर्यंत एकूण 1,93,655 मतांची मोजणी झाली असून, त्यापैकी 1,77,115 मते वैध आणि 16,540 मते अवैध ठरली आहेत. या निवडणुकीत विजयासाठी 88,558 मतांचा कोटा निश्चित करण्यात आला आहे. डॉ. प्रतापसिंह पाटील यांना सध्या आघाडी मिळाली असली, तरी विजयाचा कोटा पूर्ण करण्यासाठी त्यांना आणखी मतांची आवश्यकता आहे. त्यामुळे पुढील मतमोजणीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
अमरावती विभाग शिक्षक मतदारसंघाची मतमोजणी गेल्या 25 तासांपासून सुरू असून, 18 व्या बाद फेरीअंती शिवसेना महायुतीचे उमेदवार किरण सरनाईक यांनी 3,441 मतांची आघाडी घेतली आहे. सरनाईक यांना 8,796 मते मिळाली आहेत, तर काँग्रेसच्या उमेदवार अदिती पोहरे यांना 5,355 आणि शिवसेनेचे बंडखोर उमेदवार श्रीकांत देशपांडे यांना 5,035 मते मिळाली आहेत. पहिल्या पसंतीच्या मतांमधून कोणत्याही उमेदवाराला विजयासाठी आवश्यक असलेला 16,134 मतांचा कोटा पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे सध्या दुसऱ्या पसंतीच्या मतांची मोजणी सुरू आहे. विजयासाठी किरण सरनाईक यांना आणखी 7,338 मतांची आवश्यकता असून, विजयाचा कोटा कोण पूर्ण करणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीतील मतमोजणीदरम्यान चुरस वाढली आहे. विजयासाठी आवश्यक असलेला 75,438 मतांचा कोटा कोणताही उमेदवार गाठू शकणार नसल्याने उमेदवारांचे एलिमिनेशन अर्थात बाद फेरी सुरू झाली आहे. सध्या भाजपचे उमेदवार सुधाकर कोहळे 4,294 मतांनी आघाडीवर आहेत. दरम्यान, अवैध मतांची फेरमोजणी करण्याची मागणी सुधाकर कोहळे यांनी केली आहे. अंतिम निकालात आपणच विजयी होऊ, असा दावाही त्यांनी केला आहे. त्यामुळे नागपूर पदवीधर मतदारसंघाच्या अंतिम निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिक्षक मतदारसंघाच्या मतमोजणीत आतापर्यंत 26 उमेदवार बाद झाले असून, कौस्तुभ गावडे यांनी 17,948 मतांसह पहिल्या क्रमांकावर आघाडी कायम ठेवली आहे. सचिन सानप 11,658 मतांसह दुसऱ्या, दत्तात्रय सावंत 10,574 मतांसह तिसऱ्या, तर विद्यमान आमदार जयंत आसगावकर 8,620 मतांसह चौथ्या क्रमांकावर आहेत. विजयासाठी आवश्यक असलेला 25,756 मतांचा कोटा अद्याप कोणत्याही उमेदवाराला पूर्ण करता आलेला नाही. त्यामुळे बाद झालेल्या 26 उमेदवारांच्या दुसऱ्या पसंतीच्या मतांचे हस्तांतरण निर्णायक ठरणार आहे. कौस्तुभ गावडे यांची आघाडी कायम असली, तरी दुसऱ्या पसंतीच्या मतांमुळे निकालाचे गणित बदलण्याची शक्यता आहे. त्यामुळे एलिमिनेशनच्या पुढील फेऱ्यांनंतरच विजयाचे अंतिम चित्र स्पष्ट होणार आहे.
मराठवाडा पदवीधर निवडणुकीत ८९ हजार मतांचा कोटा असून, NCP-SP चे डॉ. प्रतापसिंह पाटील यांना पहिल्या पसंतीची ७८,५४० मते मिळाली आहेत. आता दुसऱ्या पसंतीच्या मतमोजणीवर निकालाचं गणित अवलंबून असून, अंतिम निकाल आज दुपारनंतर अपेक्षित आहे.
मराठवाडा पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या तिसऱ्या फेरीतील मतमोजणीत NCP (SP) चे डॉ. प्रतापसिंह पाटील यांनी आघाडी कायम ठेवली आहे. त्यांना 78,540 मते मिळाली असून NCP (AP) चे सतीश चव्हाण यांना 55,180 मते मिळाली आहेत. रविराज साबळे यांना 20,470, तर दिलीप घुगे यांना 8,366 मते मिळाली आहेत. डॉ. प्रतापसिंह पाटील हे सतीश चव्हाण यांच्यापेक्षा 23,360 मतांनी आघाडीवर आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.