‘धंगेकरला पालिकेत कोणी विचारत नाही…’; नवनाथ बन यांचा पुन्हा हल्लाबोल, ‘माकडछाप’ म्हणत डिवचलं

विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला आहे. नवनाथ बन यांनी रवींद्र धंगेकर यांच्यावर 'माकडछाप' म्हणत टीका केली असून शिवसेनेकडे कारवाईची मागणी केली आहे.

‘धंगेकरला पालिकेत कोणी विचारत नाही…’; नवनाथ बन यांचा पुन्हा हल्लाबोल, ‘माकडछाप’ म्हणत डिवचलं

विधान परिषदेच्या शिक्षक आणि पदवीधर मतदारसंघांच्या पाच जागांच्या निवडणुकीत महाविकास आघाडीने तीन, तर महायुतीने दोन जागा जिंकल्या. या निकालानंतर महायुतीतील अंतर्गत मतभेद समोर येऊ लागले आहेत. शिवसेनेने योग्य समन्वय ठेवला असता, तर आणखी दोन जागा जिंकता आल्या असत्या, असा आरोप भाजपकडून करण्यात आला. त्यातच शिवसेना नेते रवींद्र धंगेकर यांच्या वक्तव्यांवरून भाजप नेते नवनाथ बन यांनी जोरदार टीका केली आहे. तसेच शिवसेना नेतृत्वाने या प्रकरणी स्पष्ट भूमिका घ्यावी आणि संबंधितांवर कारवाई करावी, अशी मागणी केली आहे.

नवनाथ बन म्हणाले की, गेल्या काही दिवसांपासून शिवसेना-भाजप युतीबाबत चर्चा सुरू आहे. अशा परिस्थितीत पुण्यातील एका माजी आमदाराकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि आपल्यावर टीका केली जात आहे. यावेळी त्यांनी संबंधित नेत्याचा ‘माकडछाप’ असा उल्लेख करत त्यांच्यावर निशाणा साधला. अनेक पक्ष बदलून शिवसेनेत प्रवेश केला, तरीही राजकीय कारकीर्द घडवता आली नाही, असा टोला त्यांनी लगावला. पुणेकरांनी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत त्यांना नाकारले असून त्यांचे डिपॉझिटही जप्त झाले, असा दावा बन यांनी केला. “माझ्यामागे कमळ आहे, मात्र तुझ्यामागे १२ पक्ष होते, तरीही करिअर घडू शकले नाही. उद्या कदाचित तुझ्याकडे शिट्टी असेल,” अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

निलेश राणे माझे जवळचे मित्र

निलेश राणे यांच्याबाबत बोलताना बन यांनी ते आपले जवळचे मित्र असल्याचे सांगितले. त्यांच्यावर टीका करणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. आपण एकनाथ शिंदे यांच्याबद्दल कोणतेही अपशब्द वापरलेले नाहीत किंवा त्यांना जाब विचारलेला नाही. केवळ काही बाबी त्यांच्या निदर्शनास आणून दिल्या आहेत, असे बन म्हणाले.

धंगेकर आणि सत्तार यांच्या भूमिकेवर शिवसेनेला सवाल

उदय सामंत यांच्याबाबत बोलताना बन यांनी रवींद्र धंगेकर आणि अब्दुल सत्तार यांच्या वक्तव्यांवर शिवसेनेने स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी केली. धंगेकर आणि सत्तार बोलतात ती शिवसेनेची अधिकृत भूमिका आहे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. पदवीधर उमेदवार स्मिता जाधव यांना पराभूत करण्यासाठी धंगेकर यांनी प्रयत्न केल्याचा आरोपही त्यांनी केला. तसेच सत्तार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या विरोधात घेतलेल्या भूमिकेचे शिवसेना समर्थन करते का, असा प्रश्न त्यांनी विचारला.

पुण्यात भाजपचा पराभव करण्यासाठी धंगेकर यांनी अधिकृत प्रचाराच्या विरोधात काम केल्याचा दावाही बन यांनी केला. महायुतीत राहून भाजपविरोधात काम करणाऱ्यांवर कारवाई होणार का, हा आपला साधा प्रश्न असल्याचे त्यांनी सांगितले. बच्चू कडू यांनी भाजपच्या काही लोकांनी त्यांच्या विरोधात काम केल्याचे म्हटले होते. त्यानंतर बंडखोरांवर प्रदेशाध्यक्षांनी सहा वर्षांच्या निलंबनाची कारवाई केली. मग धंगेकर किंवा सत्तार यांनी भाजपविरोधात काम केले असेल, तर त्यांच्यावर कारवाई का होऊ नये, असा सवाल बन यांनी केला. अमरावतीमध्ये भाजपने अशी कारवाई केल्याचेही त्यांनी सांगितले.

महायुतीत दुरावा नको, पण कारवाईबाबत भूमिका स्पष्ट करा

महायुतीत कोणताही दुरावा निर्माण होऊ नये, हा आपला प्रयत्न असल्याचे बन यांनी स्पष्ट केले. मात्र, काही पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या वक्तव्यांमुळे युतीत फूट पडत असेल, तर तिन्ही नेत्यांनी एकत्र बसून अशा प्रकारांना आळा घालावा, असे ते म्हणाले. एकनाथ शिंदे यांना आपण जाब विचारलेला नाही, तर केवळ वस्तुस्थिती मांडली आहे. एकेरी उल्लेख करणे आपल्या संस्कारात नाही; धंगेकर ज्या पद्धतीने बोलतात, त्यांना त्याच भाषेत उत्तर दिले, असेही त्यांनी सांगितले.

धंगेकरांना महापालिकेत कोणी विचारत नव्हते, त्यांना त्यांची जागा दाखवण्यात आली आहे, असा टोलाही बन यांनी लगावला. त्यानंतर एकनाथ शिंदे आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल बोलावे, असे ते म्हणाले. राष्ट्रवादीकडून बंब यांच्याविरोधात तक्रार आल्यास निश्चित कारवाई केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले. आता शिवसेना नेतृत्वाने धंगेकर आणि सत्तार यांच्या भूमिकेबाबत काय निर्णय घ्यायचा, हे ठरवावे, अशी मागणी नवनाथ बन यांनी केली आहे.

 

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number