PM Modi Reaction on NDA Victory in Bihar Election 2025 : बिहार विधानसभा निवडणुकांकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागून राहिलं होतं. त्यातच निवडणुकीच्या काही दिवस आधी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी निवडणूक आयोग आणि भाजपवर गंभीर आरोप केले होते. यानंतरही भाजपप्रणित राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (NDA) मोठा विजय मिळवला आहे. गेल्या निवडणुकीच्या तुलनेत यंदा सत्ताधारी आघाडीने 243 पैकी 200 हून अधिक जागा जिंकून अभूतपूर्व यश मिळवले. दुसरीकडे, तेजस्वी यादव यांच्या नेतृत्वाखालील महाआघाडीला मोठा दणका बसला असून, त्यांना पन्नास जागाही मिळाल्या नाहीत. या ऐतिहासिक विजयानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या अधिकृत 'एक्स' अकाउंटवरून पोस्ट शेअर करत बिहारच्या जनतेचे आभार मानले आणि महत्त्वाचे आश्वासन दिले आहे.
पंतप्रधान मोदींच्या पोस्टमध्ये काय आहे?
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या पोस्टमध्ये या विजयाचा अर्थ स्पष्ट केला आहे: “सुशासनाचा विजय झाला आहे. विकासाचा विजय झाला आहे. जनकल्याणाच्या भावनेचा विजय झाला आहे. सामाजिक न्यायाचा विजय झाला आहे,” असे पंतप्रधानांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.
त्यांनी पुढे म्हटले आहे की, "बिहार विधानसभा निवडणुकीत भाजपाप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडीला ऐतिहासिक आणि अभूतपूर्व विजय मिळवून दिल्याबद्दल मी राज्यातील जनतेचे मनःपूर्वक आभार मानतो. हा प्रचंड जनादेश आम्हाला जनता-जनार्दनाची सेवा करण्याची आणि बिहारसाठी नव्या संकल्पाने काम करण्याची ताकद देणारा आहे."
यासोबतच त्यांनी राज्यातील जनतेला विविध विकासकामांचं आश्वासन दिलं आहे.
हेही वाचा - Bihar Election Result 2025: बिहार निवडणुकीत NDA चा ऐतिहासिक विजय! अमित शाह यांनी दिली पहिली प्रतिक्रिया
एनडीएचा मोठा विजय आणि महाआघाडीला व्हाईटवॉश
बिहारमध्ये विधानसभेच्या एकूण 243 जागा आहेत. त्यापैकी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने 200 हून अधिक जागांवर विजयी आघाडी घेतली आहे. सत्ताविरोधी लाट असूनही विरोधकांना मोठा फटका बसला आहे.
एनडीएचे यश: भाजपने 90 हून अधिक जागांवर आणि नितीश कुमार यांच्या जनता दल युनायटेडने (JDU) 80 पेक्षा जास्त जागांवर आघाडी घेतली आहे. चिराग पासवान यांची लोक जनशक्ती पार्टी जवळपास 28 जागांवर आघाडीवर असून इतर मित्रपक्षांनी चार जागांवर सरशी मिळवली आहे. भाजपने 101 तर जेडीयूने 101 जागांवर उमेदवार दिले होते, तर मित्रपक्षांसाठी 41 जागा सोडण्यात आल्या होत्या.
महाआघाडीची पीछेहाट
तेजस्वी यादव यांच्या राष्ट्रीय जनता दलाला (RJD) 30 पेक्षा कमी आणि काँग्रेसला जवळपास चार जागांवर आघाडी मिळाली आहे, ज्यामुळे महाआघाडीचा सुपडासाफ झाला आहे.
या अभूतपूर्व यशानंतर पंतप्रधान मोदी सायंकाळी सहा वाजता दिल्लीतील भाजप मुख्यालयाला भेट देऊन विजयी जल्लोषात सहभागी होणार आहेत.
हेही वाचा - 'राहुल गांधी.. 95!' बिहारमधील यशानंतर भाजपने उडवली जोरदार खिल्ली 'असा पराभवांचा विक्रम.. आकडा वाढतच आहे!