Saturday, November 15, 2025 06:09:05 PM

सांगलीत भरदिवसा धूम स्टाईल चोरी; 40 तोळ्यांचे दागिने लंपास

सांगलीत भरदिवसा 40 तोळ्यांच्या दागिन्यांची बॅग चोरट्यांकडून लंपास; धक्कादायक घटना सीसीटीव्हीत कैद, पोलिसांचा तपास सुरू.

सांगलीत भरदिवसा धूम स्टाईल चोरी 40 तोळ्यांचे दागिने लंपास

सांगली: शहरात भरदिवसा धक्कादायक चोरीची घटना उघडकीस आली आहे. पुष्पराज चौकात कर्मवीर पाटील पतसंस्थेसमोर एका वृद्ध नागरिकाची 40 तोळ्यांचे सोन्याचे दागिने असलेली बॅग अज्ञात चोरट्यांनी लंपास केली. विशेष म्हणजे ही संपूर्ण घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून, पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली आहेत.

प्राप्त माहितीनुसार, ध्यानचंद सगळे हे आपल्या 40 तोळे सोन्याचे दागिने पतसंस्थेच्या लॉकरमध्ये ठेवण्यासाठी गेले होते. ते दागिने एका बॅगेत ठेवून चालत जात असताना, त्यांचा पाठलाग करत असलेल्या दोन अज्ञात चोरट्यांनी दुचाकीवरून 'धूम स्टाईल'ने ही बॅग हिसकावली आणि घटनास्थळावरून पलायन केले.

चोरी झाल्यानंतर काही मिनिटांतच याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्यास देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल होताच त्यांनी परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले असता, चोरटे दुचाकीवरून बॅग हिसकावताना स्पष्टपणे दिसून आले. सध्या पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून, चोरट्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा:विहिरीचा कडा ढासळल्याने 2 शाळकरी मुलांचा दुर्दैवी मृत्यू

विश्रामबाग पोलीस ठाण्याचे अधिकारी यांनी सांगितलं की, सीसीटीव्हीच्या आधारे आरोपींचा माग काढला जात आहे. लवकरच आरोपींना अटक केली जाईल. नागरिकांनीही सावधगिरी बाळगावी आणि मोठ्या प्रमाणात दागिने घेऊन एकटे फिरणे टाळावे.

सध्या पोलीस विविध पथकांच्या मदतीने परिसरातील सीसीटीव्ही फुटेज, मोबाईल लोकेशन ट्रॅकिंग आणि स्थानिक माहितीदारांच्या साहाय्याने तपास करत आहेत. चोरीची पद्धत पाहता, आरोपी हे अनुभवी आणि पूर्वनियोजित टोळीतील असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

या घटनेनंतर सांगलीतील नागरिकांमध्ये चिंता वाढली आहे. ही घटना नागरिकांसाठी एक इशारा ठरली असून, मौल्यवान वस्तू घेऊन बाहेर पडताना अधिक काळजी घेण्याची गरज आहे.


सम्बन्धित सामग्री