समृद्धी महामार्गावर दोन वेगवेगळ्या ठिकाणी अपघाताच्या घटना घडल्याने महामार्गावरील सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावरील चॅनेज 62/100 येथे एका कारने अज्ञात वाहनाला मागून जोरदार धडक दिली. एका भीषण धडकेत एर्टिगा कारचालकाचा जागीच मृत्यू झाला असून अपघातानंतर संबंधित अज्ञात वाहन घटनास्थळावरून पसार झाल्याची माहिती समोर आली आहे.
हेही वाचा- दुर्गा विसर्जनाला गालबोट! विसर्जनादरम्यान दोन जण गंभीर जखमी; अमरावतीत नेमकं काय घडलं?
या भीषण अपघाताची तीव्रता घटनास्थळावरील परिस्थितीवरून स्पष्ट होत असून, अपघातात एर्टिगा कारचा अक्षरशः चक्काचूर झाल्याचे पाहायला मिळाले. कारचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून, या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, अपघात नेमका कसा घडला, याबाबत अधिक माहिती मिळवण्यासाठी पोलीस पुढील तपास करत आहेत.
तर दुसरीकडे येळाकेळी इंटरचेंजजवळ स्विफ्ट कारचा टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन अपघात झाला. सुदैवाने, या कारमधील दोघेही सुखरूप बचावले आहेत. एकाच महामार्गावर घडलेल्या या दोन घटनांमुळे वाहनचालकांनी प्रवासादरम्यान वेगावर नियंत्रण ठेवण्यासोबतच वाहनांच्या टायरसह इतर तांत्रिक बाबींची नियमित तपासणी करण्याचे महत्त्व पुन्हा अधोरेखित झाले आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.