वैष्णोदेवीच्या दर्शनासाठी अहिल्यानगरवरून जम्मूला गेलेल्या भाविकांचा विमानप्रवास निसर्गाच्या लहरीपणामुळे अत्यंत थरारक ठरला. जम्मू विमानतळावर पोहोचताच अचानक बदललेले हवामान, मुसळधार पाऊस आणि दाट ढगांमुळे निर्माण झालेल्या धुकेमय वातावरणामुळे विमानाची दृश्यमानता पूर्णपणे शून्य झाली होती. यामुळे विमान धावपट्टीवर उतरवणे वैमानिकासाठी मोठे आव्हानात्मक बनले होते. विमान हवेतच सतत घिरट्या घालत राहिल्याने आकाशात निर्माण झालेल्या या अनपेक्षित परिस्थितीमुळे सर्व प्रवाशांच्या काळजाचा ठोका चुकला होता. मात्र, अत्यंत प्रतिकूल आणि बिकट परिस्थितीतही विमानाचे कॅप्टन समीर मल्होत्रा यांनी दाखवलेले कमालीचे धैर्य आणि व्यावसायिक कौशल्यामुळे चौथ्या प्रयत्नात विमान सुखरूप जमिनीवर उतरवण्यात यश आले. या यशस्वी लँडिंगनंतर सर्व प्रवाशांचा जीव भांड्यात पडला.
प्रतिकूल वातावरणामुळे निर्माण झाली भीतीची परिस्थिती
अहिल्यानगर शहरासह लगतच्या परिसरातील तब्बल 55 भाविक ‘जय मातादी ग्रुप’च्या माध्यमातून पुणे आणि दिल्लीमार्गे जम्मूकडे प्रवासाला निघाले होते. या ग्रुपमध्ये नाना भवर, नगरसेवक निखिल वारे, आमी संघटनेचे अध्यक्ष जयद्रथ खाकाळ, उद्योजक किसन सातपुते, महेंद्र उपाध्ये, ॲड. संदीप भोगेगाडे, मधुकर चौधरी, कैलास गाडीलकर यांच्यासह अनेक प्रमुख नागरिक सहभागी होते. सर्व प्रवासी सकाळी 7 वाजून 30 मिनिटांच्या सुमारास दिल्लीहून विमानाने जम्मूकडे रवाना झाले होते. मात्र, जम्मूकडे विमान उतरण्याची वेळ जवळ आली असता, हवामानाने पूर्णपणे यू-टर्न घेतला. जोरदार पाऊस आणि ढगांच्या प्रचंड गोळ्यानुसार विमानतळ पूर्ण झाकोळला गेल्याचे वैमानिकाने प्रवाशांना सांगितले.
अनेक प्रयत्न अपयशी ठरल्याने प्रवाशांमध्ये पसरली शांतता
जम्मू विमानतळावर विमान खाली उतरवण्याचे सुरुवातीचे तिन्ही प्रयत्न हवामानाची साथ न मिळाल्यामुळे अयशस्वी ठरले. परिस्थिती अधिक बिघडल्यास विमान अमृतसर किंवा चंदीगडकडे वळवावे लागेल, अथवा पुन्हा दिल्लीला न्यावे लागेल, अशी शक्यता निर्माण झाली होती. खिडकीच्या बाहेर केवळ दाट पांढरे ढग आणि खाली उतरण्याचे वारंवार हुकणारे प्रयत्न पाहून नेहमी विमानप्रवास करणारे प्रवासीदेखील धास्तावले.
हेही वाचा – गडचिरोलीत खळबळ! आई-वडिलांनी घरी नेलं नाही; 14 वर्षीय विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल
विमानात अघोषित शांतता पसरली होती आणि प्रत्येक जण मनातून देवाचा धावा करत होता. अशा या तणावपूर्ण वातावरणात कॅप्टन मल्होत्रा यांनी श्रीनगरच्या पर्यायी मार्गाचा वापर करत जम्मू विमानतळावर विमान सुरक्षितपणे उतरवण्याचे निकराचे प्रयत्न सुरूच ठेवले. अखेर तब्बल 10 मिनिटांच्या अथक संघर्षानंतर वातावरणात काहीसा मोकळेपणा आला आणि दृश्यमानता सुधारताच चौथ्या प्रयत्नात विमान सुखरूप धावपट्टीला स्पर्श करून थांबले. या थरारक अनुभवानंतर नवरात्रोत्सवात वैष्णोमातेनेच आपल्या सगळ्यांचे प्राण वाचवले, अशी भावना भाविक नाना भवर यांनी व्यक्त केली.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.