उबाठा गटाचे विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. या प्रकरणातील पाचही आरोपींना अटक करण्यात आली असून, आता माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांचे पती राजेंद्र शिंदे यांची खंडणी विरोधी पथकाकडून चौकशी सुरू आहे.
प्रदीप पूर्णेकर यांची काही दिवसांपूर्वी गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. या हत्येमागे माजी महापौर मीनाक्षी शिंदे आणि त्यांचे पती राजेंद्र शिंदे यांचाच हात असल्याचा गंभीर आरोप पूर्णेकर कुटुंबीयांनी केला होता. हे कारस्थान निवडणुकीआधीपासूनच रचले गेले होते आणि यापूर्वीही पूर्णेकर यांना मारण्याचा प्रयत्न झाल्याचा दावा कुटुंबीयांनी पुराव्यांसह पत्रकार परिषदेत केला होता.
मात्र, मीनाक्षी शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन हे सर्व आरोप फेटाळून लावले होते.
आता सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात आल्यानंतर तपासाला वेग आला आहे. खंडणी विरोधी पथकाकडून गेल्या एक तासापासून राजेंद्र शिंदे यांची कसून चौकशी सुरू आहे. या चौकशीतून काय निष्पन्न होते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
पूर्णेकर कुटुंबीयांच्या म्हणण्यानुसार, या हत्येचे मूळ सूत्रधार मीनाक्षी शिंदे आणि राजेंद्र शिंदेच आहेत. त्यामुळे राजेंद्र शिंदे यांच्या चौकशीनंतर या प्रकरणात आणखी मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
हेही वाचा – गडचिरोलीत खळबळ! आई-वडिलांनी घरी नेलं नाही; 14 वर्षीय विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल