राज्यातील विविध विभागांमधील रिक्त पदांच्या भरतीसाठी MPSC विद्यार्थ्यांकडून मंत्री आणि अधिकाऱ्यांना फोन तसेच ईमेल करण्याचे सत्र सुरू असल्याची माहिती समोर येत आहे. अनेक खात्यांमध्ये पदे रिक्त असताना भरती प्रक्रिया कधी राबवणार, असा सवाल विद्यार्थी उपस्थित करत आहेत. आरोग्य, गृह आणि शिक्षण विभागाला सर्वाधिक ईमेल प्राप्त झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. काही मंत्री आणि अधिकाऱ्यांचे मेलबॉक्स भरल्याचीही चर्चा आहे. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना उत्तर देताना काही मंत्री आणि अधिकारी अडचणीत येत असल्याचा दावा केला जात असून, फोनवर प्रश्न विचारल्यानंतर काही जण कॉल कट करत असल्याची माहितीही सूत्रांनी दिली आहे.
रायगडच्या दिवेआगर समुद्रकिनारी आठ विद्यार्थ्यांचा बुडून मृत्यू झाल्याप्रकरणी मोठी कारवाई करण्यात आली आहे. आळंदीच्या विनर्स अकॅडमीचे संस्थापक शिक्षक अमर आडक, तसेच मृणाल नरसखेडे, सबा महबूब इनामदार, शिल्पा अमर आडक आणि वैष्णवी मृणाल नरसखेडे या पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सहलीचे नियोजन आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप पालकांनी केला आहे. मृत विद्यार्थी राजवीर वाहिले यांच्या वडिलांच्या तक्रारीवरून हा गुन्हा दाखल झाला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
मुंबई अहमदाबाद महामार्गावर इलेक्ट्रिक सामानाच्या आडून सुरू असलेल्या गुटखा तस्करीचा पर्दाफाश करण्यात पालघर पोलिसांना यश आलं. कारवाई दरम्यान तब्बल 49 लाख 24 हजार 800 रुपयांचा गुटखा जप्त केला. महामार्गावर दापचरी सीमा तपासणी नाक्यावर तलासरी पोलिसांनी सापळा रचत कारवाई केली. गुटखा वाहतुकीसाठी वापरण्यात आलेल्या टेम्पोसह एकूण 61 लाख 24 हजार 800 रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्यातील खराशी गावामध्ये महाप्रसादाची जीवन घेतल्यानंतर गावातील दीडशे ते दोनशे नागरिकांची प्रकृती खालावली आहे नागरिकांना उलट्या व हगवण त्याचा त्रास सुरू झालेला आहे. सकाळपासूनच नागरिकांनी रुग्णालयात गर्दी केली असून अनेक नागरिक ग्रामीण व काही खाजगी रुग्णालयात उपचार घेत असून गावांमध्येही आरोग्य विभागाकडून कॅम्प लावून उपचार सुरू आहेत.
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहून या प्रकल्पाला स्थगिती देण्याची मागणी केली आहे. ठाण्यातील निवासी भागात प्रस्तावित असलेल्या या डेटा सेंटरमुळे नागरिकांच्या पाणीपुरवठा, वीजपुरवठा, आरोग्य आणि पर्यावरणावर गंभीर परिणाम होऊ शकतात, अशी भीती संजय राऊत यांनी व्यक्त केली आहे.
म्हाडाच्या 15 टक्के सामाजिक आणि 20 टक्के सर्वसमावेशक गृहनिर्माण योजनांसाठी मुदतवाढ करण्यात आली असून आता 30 ऑक्टोबर 2026 रोजी रात्री 11.59 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. कागदपत्रांची ऑनलाइन पडताळणी आणि महाआयटी प्रणालीच्या अद्ययावतीकरणामुळे निर्णय घेण्यात आल्याचे समोर आले आहे.
भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात औषधांची टंचाई असल्याच्या तक्रारींमुळे जिल्हा आरोग्य यंत्रणेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. दररोज ग्रामीण भागातून अनेक गोरगरीब, गरजू आणि वयोवृद्ध नागरिक उपचारासाठी येथे येतात. मात्र, आवश्यक औषधे मिळाली नाहीत, तर नाइलाजाने खासगी मेडिकलमधून महागडी औषधे खरेदी करण्याची वेळ त्यांच्यावर येते. मग अत्यल्प दरातील शासकीय आरोग्यसेवेचा लाभ घ्यायचा तरी कसा? औषधांचा नियमित पुरवठा सुनिश्चित करण्याची जबाबदारी नेमकी कुणाची? या प्रश्नांची दखल घेऊन संबंधित आरोग्य प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारीचा आज शेवटचा दिवस असून दुपारी तीन वाजेपर्यंत किती उमेदवार माघार घेतात, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे. दरम्यान, पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, सभापती राम शिंदे आणि ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत शासकीय विश्रामगृहात जिल्ह्यातील आजी-माजी लोकप्रतिनिधी आणि सहकार क्षेत्रातील दिग्गजांची बैठक पार पडली.
येवला तालुक्यात पेट्रोल पंपाच्या मंजुरीसाठी बनावट स्वाक्षरी आणि खोटा जावक क्रमांक वापरून कंपनीची दिशाभूल केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या प्रकरणी हिंदुस्थान पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेडची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बनावट दाखला कोणी तयार केला आणि त्यामागे कोणाचा हात आहे, याचा पोलीस तपास करणार आहेत.
हिंगोलीच्या वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीत दसऱ्याच्या मुहूर्तावर हळदीच्या दराने मोठी झेप घेतली आहे. 20 ऑक्टोबरच्या लिलावात दर्जेदार हळदीला प्रतिक्विंटल तब्बल 28 हजार रुपयांचा उच्चांकी भाव मिळाला, तर बाजारपेठेत सुमारे सात हजार कट्ट्यांची आवक झाली. अपुऱ्या पावसामुळे हळदीच्या उत्पादनात घट होण्याची शक्यता असून,आगामी काळातही दरातील तेजी कायम राहण्याचा अंदाज व्यापाऱ्यांनी व्यक्त केला आहे. या दरवाढीमुळे हळद उत्पादक शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दिल्लीच्या दौऱ्यावर असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याच्या 31 ऑक्टोबर रोजी होणाऱ्या धर्मध्वजारोहण सोहळ्यासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना निमंत्रण देणार असल्याची माहिती आहे.
धुळे जिल्ह्यात पावसाने ओढ दिल्याने झालेल्या खरीप पिकांच्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना शिंदे गटाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील दसरा मेळाव्याला जाणे टाळले. मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार जिल्हाप्रमुख सतीश महाले आणि इतर पदाधिकाऱ्यांनी शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात प्रत्यक्ष जाऊन शेतकरी कुटुंबांची भेट घेतली व त्यांना दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर कपड्यांचे वाटप केले. या बिकट संकटकाळात सरकार आणि पक्ष पूर्णपणे शेतकऱ्यांच्या पाठीशी उभा असून शेतकऱ्यांनी खचून न जाता धीर धरावा, असा दिलासा यावेळी पदाधिकाऱ्यांनी दिला.
टायगर श्रॉफच्या घराबाहेर झालेल्या गोळीबार प्रकरणात दिल्ली पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. या प्रकरणात दोन महिलांसह चार आरोपींना अटक करण्यात आली आहे. तपासानुसार, आरोपींनी शस्त्रांची व्यवस्था करण्यासह मुंबईत पिस्तूल पोहोचवण्यात कथित भूमिका बजावली. या आरोपींचा गोळीबाराच्या कटात नेमका काय सहभाग होता, तसेच या संपूर्ण प्रकरणामागे आणखी कोणाचा हात आहे का, याचा तपास आता मुंबई पोलीस करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.