Nitesh Rane Allegations on Abhijeet Dipke: केंद्रीय निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी कॉकरोच जनता पार्टीचे (CJP) संस्थापक अभिजीत दीपके आणि त्यांचे सहकारी शनिवारी दिल्लीत जंतर-मंतरवर मोठ्या आंदोलनासाठी दाखल झाले होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या आंदोलनाचा धसका घेत अभिजीत दीपके यांचे विमान दिल्ली विमानतळावर लँड होताच त्यांना धावपट्टीवरच ताब्यात घेतले. पोलिसांनी विमानामध्ये प्रवेश करून दीपके यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला, परंतु आंदोलनावर ठाम राहिल्याने त्यांना तात्काळ विमानतळाच्या वेटिंग रूममध्ये स्थानबद्ध करण्यात आले. या कारवाईमुळे सीजेपीच्या दिल्लीतील आंदोलनाला मोठा दणका बसला आहे.
‘मोदींना शिव्या देणारे पाकिस्तानची स्क्रिप्ट वाचत आहेत’; मंत्री नितेश राणेंचा घणाघाती आरोप
सीजेपीच्या या आंदोलनावरून आणि युट्युबर ध्रुव राठीच्या सहभागावरून महाराष्ट्र सरकारमधील मंत्री नितेश राणे यांनी अत्यंत आक्रमक भूमिका घेत जोरदार हल्लाबोल केला आहे. ‘मुळात ज्यांना वाटतंय की, जंतर-मंतर त्यांच्या बापाचे पाकिस्तान आहे, ते उमर खालिद प्रेमी आणि हिंदू द्वेषी आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना शिव्या देणारे हे लोक प्रत्यक्षात पाकिस्तानचीच स्क्रिप्ट वाचत आहेत,’ असा सनसनाटी आरोप राणे यांनी केला. ही तुकडे-तुकडे गँग असून 4-5 टवाळकी आणि पाकिस्तानातील एजंट यांच्यात काहीही फरक उरलेला नाही, असा टोलाही त्यांनी लगावला.
‘गेल्या आंदोलनाचे 200 सोशल मीडिया अकाऊंट्स पाकिस्तानातून हँडल’; राणेंचा मोठा दावा
आंदोलनकर्त्यांच्या हेतूवर प्रश्न उपस्थित करताना नितेश राणे म्हणाले की, यापूर्वी विद्यार्थ्यांनी उभारलेल्या आंदोलनाच्या खांद्यावर बंदूक ठेवून या लोकांनी आपले राजकीय स्वार्थ साधले आहेत. ‘गेल्या वेळी जंतर-मंतरवर झालेल्या आंदोलनाचे नियंत्रण करणारे तब्बल 200 अकाऊंट्स थेट पाकिस्तानातून चालवले जात असल्याचे तपासात समोर आले होते. यावेळीही जर तसा प्रयत्न केला, तर या आंदोलकांना थेट त्यांच्या बापाच्या घरी म्हणजे पाकिस्तानातच पाठवून देऊ,’ असा इशारा त्यांनी दिला. भारतात शरिया कायदा नव्हे तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे संविधान चालते, अशी आठवणही त्यांनी करून दिली.
युट्युबर ध्रुव राठीवर आक्रमक टीका; प्रभू श्रीराम अन् साखळी वक्तव्यांचा निषेध
प्रसिद्ध युट्युबर ध्रुव राठीवर कडक टीका करताना नितेश राणे म्हणाले की, ध्रुव राठीसारख्या लोकांनी यूट्यूबच्या माध्यमातून प्रभू श्रीराम आणि माता सीता यांच्यावर अशोभनीय व अभद्र विचार मांडले होते. देश तोडण्याचा आणि समाजात अराजकता पसरवण्याचा प्रयत्न करणाऱ्या अशा लोकांवर पोलिसांनी कठोर पावले उचललीच पाहिजेत. कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी दिल्ली पोलिसांनी घेतलेली भूमिका पूर्णपणे योग्य असल्याचे राणे यांनी स्पष्ट केले.
अभिजीत दीपके यांची ‘दहशतवाद्यां’प्रमाणे चिथावणीखोर भाषा
सीजेपी प्रमुख अभिजीत दीपके यांच्यावर निशाणा साधताना नितेश राणे यांनी म्हटले की, दीपके ज्या प्रकारची चिथावणीखोर भाषा वापरत आहेत, ती भाषा एखादा दहशतवादीच वापरू शकतो. यांना देशातील सीएए (CAA) आणि एनआरसी (NRC) कायदा रद्द करायचा आहे आणि यांची संपूर्ण भाषा ही पाकिस्तानी समर्थकांसारखीच आहे, असा आरोप त्यांनी केला. देशाच्या सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या कोणत्याही आंदोलनाला खपवून घेतले जाणार नाही, असेही त्यांनी ठणकावून सांगितले.
दिल्लीत कडक सुरक्षा व्यवस्था; आंदोलकांना सीमेवरच रोखण्याचे प्रशासनाचे सत्र
अभिजीत दीपके यांच्यासह 500 हून अधिक आंदोलकांना दिल्लीच्या विविध भागांतून ताब्यात घेण्यात आले आहे. सीजेपीच्या या आंदोलनामुळे राजधानीत कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून दिल्ली पोलीस पूर्णपणे सतर्क आहेत. दीपके यांना दिल्ली बाहेर हलवले जाणार की विमानतळावरच ठेवले जाणार यावर अद्याप अस्पष्टता असली, तरी भाजप नेत्यांच्या या आक्रमक भूमिकेमुळे संपूर्ण प्रकरणात मोठे राजकीय नाट्य रंगले आहे.
हेही वाचा – मोठी बातमी! दिल्ली पोलिसांच्या कारवाईविरोधात CJP ची उच्च न्यायालयात धाव; याचिकेत केली ‘ही’ मोठी मागणी
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.