‘सरकार गुंडगिरीच्या भूमिकेत, लोकशाही आंदोलन..’; दिल्ली अन् मुंबईतील आंदोलकांच्या अटकेवर जरांगे पाटील संतापले

सीजेपी आंदोलकांवर होत असलेल्या पोलीस कारवाईवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना राज्य व केंद्र सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली.

‘सरकार गुंडगिरीच्या भूमिकेत, लोकशाही आंदोलन..’; दिल्ली अन् मुंबईतील आंदोलकांच्या अटकेवर जरांगे पाटील संतापले
Cjp protest Jarange

Manoj Jarange-Patil Statement on CJP Protest: विशेष सखोल पुनरीक्षण (SIR) रद्द करण्यासाठी आणि मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरण्यासाठी कॉकरोच जनता पार्टी (CJP) आणि ‘इंडिया’ आघाडीच्या वतीने शनिवारी दिल्ली आणि मुंबईत तीव्र आंदोलनाची हाक देण्यात आली होती. या आंदोलनाचा अनुभव लक्षात घेत पोलिसांनी दिल्लीसह मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदान आणि इतर परिसरांतून व्यापक धरपकड सुरू केली आहे. दिल्लीत आप नेते अरविंद केजरीवाल, तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख ममता बॅनर्जी आणि सीजेपी संस्थापक अभिजीत दीपके यांच्यासह 1700 हून अधिक आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या कारवाईमुळे विरोधी पक्षांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.

‘लोकशाही मार्गाचे आंदोलन दादागिरीने मोडून काढायचे आहे’
या पोलीस कारवाईवर मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी जालन्यात पत्रकारांशी बोलताना राज्य व केंद्र सरकारवर अत्यंत कठोर शब्दांत टीका केली. ‘सध्याचे सरकार हे पूर्णपणे गुंडगिरीच्या भूमिकेत शिरले असून त्यांना मनमानी कारभार करायचा आहे,’ असा थेट आरोप जरांगे यांनी केला. शांततापूर्ण आणि लोकशाही मार्गाने चाललेली आंदोलने दादागिरीचा वापर करून मोडून काढण्याचा कुटिल डाव प्रशासनाकडून आखला जात असल्याचे सांगत त्यांनी सरकारच्या या हुकूमशाही वृत्तीचा तीव्र निषेध नोंदवला.

‘अभिजीत दीपके यांच्या अटकेतून सरकारची…’
सरकारला विद्यार्थी, तरुण आणि गोरगरीब जनतेच्या न्याय्य मागण्या व प्रश्न सोडवण्यात अजिबात स्वारस्य उरलेले नाही, असे सांगत मनोज जरांगे पाटील पुढे म्हणाले की, ‘अभिजीत दीपके यांच्यासारख्या तरुण नेतृत्वाला अटक करून सरकार केवळ हे आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न करत आहे.’ सरकार म्हणेल त्याच पद्धतीने आंदोलने चालली पाहिजेत, असा अहंकार प्रशासनामध्ये निर्माण झाला असून, यामुळे सामान्य जनतेचा लोकशाहीवरील विश्वास उडत चालल्याचे त्यांनी ठणकावून सांगितले.

हेही वाचा – ‘ते पाकिस्ताची स्क्रिप्ट वाचत आहेत’; नितेश राणेंचा अभिजीत दिपके, ध्रुव राठीसह CJP आंदोलकांवर हल्लाबोल; ‘त्यांना वाटलं जंतरमंतर त्यांच्या अब्बाचे…’

महात्मा गांधींचे पणतू तुषार गांधी अटकेत; मुंबईत पोलीस ठाण्याबाहेर निदर्शने
दुसरीकडे, मुंबईत ऑगस्ट क्रांती मैदानावर होणाऱ्या आंदोलनापूर्वीच पोलिसांनी महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी यांना अंधेरी पश्चिमेकडील डी. एन. नगर पोलीस ठाण्यात स्थानबद्ध केले. या अटकेची बातमी पसरताच पोलीस ठाण्याबाहेर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आणि काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केली. तुषार गांधी यांच्या सुटकेची मागणी करत कार्यकर्त्यांनी परिसर डोक्यावर घेतला आणि ‘व्होट चोर, गद्दी छोड’ अशा जोरदार घोषणाबाजीने परिसर दुमदुमून टाकला. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी तेथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे निवेदने
कालच काँग्रेससह ‘इंडिया’ आघाडीच्या प्रमुख नेत्यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची भेट घेऊन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्याविरोधात अधिकृत निवेदन दिले होते. आज दिल्लीतील जंतर-मंतरवरील निदर्शनांमध्ये ‘जेन-झी’ (Gen-Z) आणि विविध विद्यार्थी संघटनांचे हजारो प्रतिनिधी रस्त्यावर उतरले होते. मात्र, दिल्ली पोलीस आणि निमलष्करी दलाच्या अवाढव्य ताफ्याने बळाचा वापर करत विद्यार्थ्यांना आंदोलनापासून रोखले. सरकार आणि पोलिसांच्या या कडक धोरणामुळे देशभरात राजकीय वातावरण अत्यंत तापले आहे.

हेही वाचा – दिल्लीत CJP चं आंदोलन तापलं; पोलिसांवर दगडफेक; 2 पोलीस कर्मचारी जखमी

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number