पुणे: पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊसच्या जमीन विक्री व्यवहारावरुन निर्माण झालेला वाद दिवसेंदिवस चिघळत असून, केंद्रीय मंत्री आणि पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर सुरू असलेली टीकेची मालिका थांबता थांबेना आहे. शिंदे गटाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पुन्हा एकदा मोहोळ यांच्यावर आरोपांची घणाघाती सरबत्ती केली आहे.
मोहोळ यांनी जैन समाजासोबत झालेल्या मतभेदांवर तोडगा काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यासाठी ते शनिवारी जैन बोर्डिंग हाऊस येथे विश्वस्तांसोबत चर्चा करण्यासाठी पोहोचले. मात्र, येथील जैन बांधवांकडून त्यांना जोरदार विरोधाचा सामना करावा लागला. घोषणाबाजी आणि आक्रमक प्रश्नांनी वातावरण तापले, त्यामुळे मोहोळ यांना तेथून परतावे लागले.
या घडामोडीनंतर धंगेकर यांनी एका ट्विटद्वारे मोहोळ यांच्यावर पुन्हा एक टीकास्त्र सोडले आहे. त्यांनी म्हटले, “जैन मंदिर वाचवा नाहीतर मंत्रिपद वाचवा, अशी स्पष्ट कानउघडणी मुंबईतील बैठकीत वरिष्ठांकडून मिळाल्यानंतरच मोहोळ जैन समाजापुढे नतमस्तक झाल्याचे दिसते. तब्बल 18 दिवसांनी पुण्याचे खासदारांना जैन समाजाची व्यथा दिसली आहे.”
हेही वाचा: Phaltan Doctor Case : फलटण डॉक्टर प्रकरणात पंकजा मुंडेंचा कुटुंबाला पाठिंबा; मुख्यमंत्र्यांना सांगून लवकर न्याय मिळवून देण्याचे आश्वासन
धंगेकर पुढे म्हणतात, “स्वतःच्या हितासाठीच जमीन खरेदी करण्यात आली होती. आता हा व्यवहार चुकीचा ठरतोय त्यामुळे तो रद्द करण्यासाठी कोणते तोंड दाखवणार? परमेश्वर मोहोळांना सद्बुद्धी देवो आणि जैन मंदिराची बळकावलेली जमीन त्यांनी तातडीने परत करावी.”
दुसरीकडे, मोहोळ यांनी आपल्याविरोधातील आंदोलनामध्ये राजकीय हेतू असल्याचे प्रतिपादन केले. मोहोळ म्हणाले, “जैन मुनींनी मला निमंत्रण देऊन या प्रकरणात हस्तक्षेप करण्याची विनंती केली होती. मी त्यांना आश्वासन दिले आहे की काही दिवसांत सर्व पक्षांशी चर्चा करून मार्ग काढू. माझा सहभाग असता तर मला बोलावले नसते.”
जैन बोर्डिंग हाऊस जमीन प्रकरणात स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे राजू शेट्टी आणि धंगेकर यांनी मोहोळ यांच्यावर आधीपासूनच टीका केली आहे. जैन बोर्डिंगची जमीन विकत घेणारे बिल्डर्स हे मोहोळ यांचे व्यावसायिक भागीदार असल्याचा आरोपही करण्यात आला होता. यावर मोहोळ यांनी, “काही विषय दुर्लक्ष केले तर सुटतात,” असे उत्तर दिले होते.
जैन समाज आणि मोहोळ यांच्यातील संघर्ष अजूनही संपलेला नाही. पुढील काही दिवसांत या वादाला कोणता तोडगा निघतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हेही वाचा: Rohit Pawar On Sanjay Shirsat : 'आता सुट्टी नाही'! संजय शिरसाट यांच्या निवृत्तीच्या संकेतांवर रोहित पवारांचा जोरदार हल्लाबोल