साताऱ्यात अंबाबाईच्या दर्शनावरून परत येत असताना भाविकांवर काळाने घाला घातला. कराड शहराजवळ पुणे-बंगळुरू महामार्गावर भरधाव ट्रकच्या धडकेत चौघांचा जागीच मृत्यू झाला तर 3 जण गंभीर जखमी झाले आहेत. साताऱ्यातील कराड शहराजवळ पुणे- बेंगलोर महामार्गावरील उड्डाणपूलावर रात्री 11 वाजण्याच्या सुमारास स्कॉर्पिओचा आणि ट्रकचा भीषण अपघात झाला असून या अपघातात 4 युवकांचा दुर्देवी अंत झाला आहे तर तीन जण जखमी झाले आहेत. ही धडक इतकी भीषण होती की यात स्कॉर्पिओचा अक्षरश: चेंदामेंदा झाला आहे.
हेही वाचा- साकीनाक्यात आगीचा भडका! भंगाराच्या गोदामाला भीषण आग, चौघांची प्रकृती गंभीर
यात तेजस देशमुख (चालक वय- 25 वर्षे), सागर निंबाळकर (वय-23 वर्षे), सुयश चिंचकर (वय-20 वर्षे), रोहीत धोत्रे (वय-21 वर्षे) अशी अपघातात ठार झालेल्या युवकांची नावे आहेत. तर ऋतुराज दुबळे (वय-21 वर्षे), शंतनू शिंगाडे (वय-20 वर्षे) आणि अमन तांबोळी (वय-23 वर्षे) अशी जखमींची नावे आहेत. अपघातातील सर्व युवक कोल्हापूरच्या महालक्ष्मीला दसऱ्यानिमित्ताने दर्शनाला गेले होते. दर्शनाहून परताना हा भीषण अपघात झाला आहे.
अपघातातील सर्व युवक साताऱ्यातील खटाव तालुक्यातील कातरखटाव गावचे आहेत. कराड शहराजवळ उभारलेल्या नवा सहापदरी उड्डाणपूल काही दिवसापूर्वीच वाहतुकीस खुला केला असून हा पहिलाच भीषण अपघात आहे. जखमीवर कराडच्या कृष्णा रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तर मृत तरुणांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून या घटनेमुळे कातरखटाव गावावर शोककळा पसरली आहे. सध्या सातारा पोलिस या अपघाताच तपास करत आहेत.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.