ठाणे जिल्ह्यातील उद्धव ठाकरे गटाचे नेते प्रदीप पूर्णकर यांच्या मृत्यूनंतर पूर्णकर कुटुंबाने पत्रकार परिषद घेऊन पोलीस तपासावर तीव्र आक्षेप घेतला आहे. मृत प्रदीप पूर्णकर यांच्या कन्येने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर थेट प्रश्नचिन्ह उपस्थित केले असून, या प्रकरणातील मुख्य संशयित आरोपी असणाऱ्या मीनाक्षी आणि राजेंद्र शिंदे यांना तात्काळ अटक करण्याची आक्रमक मागणी केली आहे. 57 दिवस लोटूनही हल्लेखोर पोलिसांच्या हाती का लागले नाहीत, असा संतप्त सवाल यावेळी पूर्णकर कुटुंबीयांनी उपस्थित केला आहे.
16 व्हिडिओ पुरावे दिल्यानंतरही पोलीस तपासात कोणतीही प्रगती नाही
पत्रकार परिषदेत बोलताना प्रदीप पूर्णकर यांच्या मुलीने पोलिसांच्या तपासावर तीव्र प्रश्नचिन्ह उपस्थित केलं. तिने सांगितले की, कुटुंबाने स्वतःहून तब्बल 16 व्हिडिओ पुराव्यांच्या स्वरूपात पोलिसांना दिले होते. मात्र, एवढे सगळे तांत्रिक पुरावे आणि माहिती उपलब्ध करून देऊनही पोलिसांनी गेल्या 57 दिवसांत नेमके काय केले? असा उद्विग्न सवाल तिने विचारला. “पोलrस फक्त हत्यार जप्त केल्याचे सांगतात, पण प्रत्यक्षात जे व्हिडिओ आम्ही गोळा करून दिले, त्यावर आधारित ठोस कारवाई करणे टाळले जात आहे,” असा गंभीर आरोप तिने केला. पुरावे हातात असतानाही मारेकरी आणि आरोपी मोकाट फिरत असल्यामुळे कुटुंबीयांवर मानसिक ताण आला आहे.
न्याय न मिळाल्यास जीवन संपवण्याची धमकी
या पत्रकार परिषदेत अत्यंत भावनिक वातावरण पाहायला मिळाले. आपल्या वडिलांच्या हत्येप्रकरणी न्याय मिळत नसल्यामुळे आणि पोलिसांच्या संथ कारभाराला कंटाळून आपल्याला आता जीवन संपवण्याची इच्छा होत असल्याची धमकी यावेळी पूर्णेकर कुटुंबाने दिली. 57 दिवसांचा कालावधी उलटून गेल्यानंतरही मुख्य आरोपींना पाठीशी घातले जात असल्याचा संशय कुटुंबीयांनी व्यक्त केला आहे. ठाणे पोलीस प्रशासनाने या प्रकरणी तातडीने दखल घेऊन मीनाक्षी आणि राजेंद्र शिंदे यांना अटक करावी, अन्यथा तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही पूर्णकर कुटुंबाने दिला आहे.