महाराष्ट्र : जितेंद्र आव्हाड हे नेहमीच आपल्या वक्तव्यांनी चर्चेत असतात. त्यातच आता जितेंद्र आव्हाडांची एक खास पोस्ट चर्चेचा विषय ठरतेय. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी मंत्री जयंत पाटील यांचा आज वाढदिवस आहे. वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर सर्वत्र शुभेच्छांचा वर्षाव होतोय. अशातच जितेंद्र आव्हाडांनी जयंत पाटलांना वाढदिवसाच्या खास शुभेच्छा दिल्यात.
हेही वाचा: मुंडेंच्या आईच्या नावाचा वापर करून आक्षेपार्ह टिप्पणी; गुन्हा दाखल
काय आहेत शुभेच्छा?
आज जयंत राजाराम पाटील म्हणजेच आमचे प्रदेशाध्यक्ष, महाराष्ट्रातील सर्वात अनुभवी आणि प्रगल्भ नेतृत्व यांचा वाढदिवस. त्यांच्या गुणावर माझे प्रचंड प्रेम आहे. ते म्हणजे तेदेखील माझ्यासारखेच प्रचंड 'आईवेडे' आहेत. आजही आई हा शब्द निघाला की त्यांच्या डोळ्यांच्या कडा पाणावतात. कधीही कोणावरही न चिडणारा, सर्वांचे म्हणणे गप्प बसून ऐकणारा , असा राजकारणी महाराष्ट्राच्या राजकारणात विरळाच! हसत खेळत लोकांच्या टोप्या उडवणारा. पण, संघटनेतील प्रत्येकाच्या स्वभावाची ओळख असणारा , संघटनेसाठी संपूर्ण महाराष्ट्रात भ्रमण करणारा, अर्थात हा भ्रमणाचा गुण त्यांना वडिलांकडून मिळालाय. माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांनी जेव्हा भारत यात्रा केली होती. तेव्हा राजाराम पाटील हे त्यांच्यासोबत सबंध महाराष्ट्र फिरले होते. एका कर्तृत्ववान बापाचा कर्तृत्ववान मुलगा , ही त्यांची ओळख त्यांनी कायम ठेवली, अशी आठवण आव्हाड यांनी सोशल मीडियावरील पोस्टमधून सांगितली आहे.
त्याचबरोबर सर्वांशी हसत खेळत वागणारा आणि कोणावरही न चिडणारा नेता सध्या तरी महाराष्ट्रात नाही. त्यांचा स्वभावगुण पाहता महाराष्ट्राचे नेतृत्व करण्याची धमक असलेले ते नेतृत्व आहे. पण, नशिबाने अजून तरी साथ दिलेली नाही. पण, ते नशिब आज ना उद्या उघडेल, याची मला खात्री आहे. अशा या माझ्या आवडत्या नेत्याला , ज्यांना मी आदरणीय शरद पवार साहेब यांच्यानंतर आपला नेता मानतो, अशा जयंत पाटलांना वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा, अशा शब्दात जयंत पाटील यांना जितेंद्र आव्हाडांनी शुभेच्छा दिल्या आहेत.