मुंबई : महिला व बालविकास विभागातील विविध रिक्त पदांची भरती करण्यासाठी मंत्रालयात महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. महाराष्ट्र शासनाने राज्यात 70 हजार पदांची भरती करण्याचा निर्णय घेतला असून, त्यापैकी 18 हजार 882 पदांची भरती महिला व बालविकास विभागात होणार आहे. यामध्ये एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत 5639 अंगणवाडी सेविका व 13243 अंगणवाडी मदतनीस अशा पदांचा समावेश आहे.
14 फेब्रुवारी ते 2 मार्च या कालावधीत मुख्य सेविका पदासाठीही सरळ सेवेच्या माध्यमातून भरती प्रक्रिया राबवली जाणार आहे. ही संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक पद्धतीने राबवण्यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना योग्य ती खबरदारी घेण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी उमेदवारांनी कोणत्याही आमिषाला बळी न पडण्याचे आवाहन केले.
बैठकीत राज्य महिला आयोग, महिला आर्थिक विकास महामंडळ, बालकल्याण समिती आणि बाल न्याय मंडळातील रिक्त पदांची भरती प्रक्रिया लवकरात लवकर सुरू करण्याचे आदेशही देण्यात आले. या बैठकीला महिला व बालविकास विभागाचे सचिव डॉ. अनुपकुमार यादव, आयुक्त कैलास पगारे यांच्यासह विविध अधिकारी उपस्थित होते.
महिला बचत गट व पोषण आहार:
महिला बचत गटांनी एकत्रितरित्या पोषण आहारासाठी आदर्श कम्युनिटी किचन सुरू करावे, यासाठी आवश्यक निधी शासनाकडून उपलब्ध करून दिला जाईल. सध्या एका संस्थेला पाच अंगणवाड्यांचा आहार पुरवठा करण्याची जबाबदारी दिली जाते. लाभार्थी संस्थेच्या कामगिरीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर अंगणवाड्यांची संख्या वाढवण्याचा किंवा कमी करण्याचा निर्णय घेतला जाणार आहे.
भिवंडी शहरातील अंगणवाडी केंद्रे वाढणार:
भिवंडी निजामपूर महानगरपालिकेच्या हद्दीत लोकसंख्या वाढीच्या पार्श्वभूमीवर अंगणवाडी केंद्रे वाढवण्याबाबत सर्वेक्षण करून अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या 341 अंगणवाडी केंद्रे कार्यरत असून, 102 अतिरिक्त केंद्रे सुरू करण्याबाबत सकारात्मक विचार सुरू आहे.
महिला व बालविकास विभागात होणारी ही भरती राज्यातील बेरोजगारांसाठी मोठी संधी ठरणार आहे. शासनाच्या या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका, मदतनीस आणि अन्य संबंधित पदांमध्ये मोठ्या प्रमाणावर भरती होणार असून, बालविकासाच्या क्षेत्रात कार्य करण्याची संधी मिळणार आहे.