देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबई शहरात नेहमीच प्रचंड वर्दळ पाहायला मिळते. त्यातही लोकल स्थानकांवर पहाटेपासून ते रात्री उशिरापर्यंत प्रवाशांचे ओढे लागलेले असतात. गर्दीच्या स्थानकांपैकी एक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस (CSMT) स्थानकावर काल रात्री एक धक्कादायक घटना घडली. बुकिंग हॉलच्या प्रवेशद्वाराजवळील छताचा काही भाग अचानक कोसळल्याने दोन प्रवासी गंभीर जखमी झाले आहेत.
मिळलेल्या माहितीनुसार, गुरुवारी रात्री ठीक 10 वाजून 05 मिनिटांनी ही घटना घडली. त्यावेळी बुकिंग हॉल परिसरात प्रवाशांची नेहमीप्रमाणे गर्दी होती. अचानक छताचा प्लास्टरचा भाग खाली कोसळला आणि दोन प्रवासी त्याखाली सापडले. बाधित ठिकाणी रेल्वे भूविकास प्राधिकरणाचे (RLDA) दुरुस्तीचे काम सुरू असल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे.
विधान परिषद निवडणुकीसाठी मतदान | Maharashtra Election
या दुर्घटनेत जखमी झालेल्या प्रवाशांची ओळख पटली आहे. विनायक बाळू हटकर (28) याच्या डोक्याच्या उजव्या बाजूला गंभीर जखम झाली असून टाके घालण्यात आले. तर अयान नौशाद माटवणकर (24) या जखमीच्या डाव्या डोळ्याच्या पापणीला, पाठीला आणि मानेला दुखापत झाली असून उजव्या घोट्याला सूज आली आहे. दोन्ही जखमींना तात्काळ सेंट जॉर्ज रुग्णालयात दाखल करण्यात आले, त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. डॉक्टरांनी त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले.
घटनेनंतर तात्काळ घटनास्थळाची साफसफाई करण्यात आली असून, सुरक्षा रक्षकांनी तो भाग बॅरिकेड करून बंद केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश रेल्वे प्रशासनाने दिले आहेत.