एप्रिल महिन्यात कोणत्या पदार्थांचे सेवन करावे? जाणून घ्या
उन्हाळा सुरू झाला की तापमान झपाट्याने वाढते. ज्यामुळे मानवी शरीर कधी कधी वातावरणातील बदल स्वीकारू शकत नाही. यामुळे या ऋतूमध्ये डिहायड्रेशन आणि पचनाच्या अनेक समस्या उद्भवतात.
त्यासोबतच, या समस्या विविध आजारांना आमंत्रण देतात. विशेषतः एप्रिल महिना असा असतो ज्यामध्ये आपल्या खाण्याच्या सवयी अचानक बदलतात.
पोषणतज्ञ हेतल छेडा यांच्या मते, आयुर्वेदामध्ये एप्रिल महिना हा वर्षातील सर्वात महत्त्वाचा महिना मानला जातो. एप्रिल महिना प्रत्येकाच्या आरोग्यासाठी महत्वाचा आहे.
एप्रिल महिन्यात आपण जे काही अन्न खातो, त्यानुसार आपल्या शरीरात योग्य ते बदल होतात. जर एप्रिल महिन्यात योग्य आहाराचे सेवन केले तर तुम्ही सुद्धा वर्षभर आजारांपासून लांब राहू शकता. चला तर जाणून घेऊया एप्रिल महिन्यात कोणते पदार्थ खाल्ल्यामुळे तुमचे शरीर फिट राहील.
1. ज्वारी - ज्वारीचे पीठ खाल्ल्याने शरीराला थंडावा मिळतो. ज्वारीच्या पिठापासून बनवलेल्या चपात्या तुम्ही खाऊ शकता. ज्वारीच्या पिठामध्ये मोठ्या प्रमाणात पौष्टिकता असते. त्यासोबतच, ज्वारी हे नैसर्गिक खनिजे आणि प्रथिनांचा स्रोत आहे.
2. हरभरे - एप्रिलमध्ये भाजलेले हरभरे खाल्ल्यामुळे शरीरातील फायबर आणि प्रोटीनची कमतरता पूर्ण होण्यास मदत होते. हरभरा खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. दररोज मूठभर हरभरे खाल्ल्याने आतड्यांचे आरोग्य चांगले राहते.
3. कारला - या भाजीत जीवाणू आणि विषाणू नष्ट करणारे गुणधर्म असतात. त्यामुळे, कारल्याचे नियमित सेवन केल्याने रक्त शुद्ध होते. एप्रिल महिन्यात सुमारे 15 दिवस दररोज अर्धा ग्लास कारल्याचा रस प्यावा. त्यामुळे तुम्ही फिट राहू शकता.
4. कडुलिंबाची पाने - कडुलिंबामध्ये मोठ्या प्रमाणात अँटीबॅक्टेरियल आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. कडुलिंबाच्या पानांचा रस पिल्याने उन्हाळ्यात मौसमी रोगांपासून संरक्षण होते आणि रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यास मदत होते. त्यामुळे, कडुलिंबाच्या पानांचा रस रोज रिकाम्या पोटी प्यावा.
(Disclaimer: ही माहिती केवळ सामान्य ज्ञानासाठी प्रदान केली आहे. जय महाराष्ट्र या माहितीची कोणतीही हमी देत नाही. आरोग्यविषयक कोणताही निर्णय घेण्यापूर्वी तज्ज्ञ किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या.)