सारंग लखानी यांच्या कंपनीला 1200 एकर जमीन देण्यावरून पेटला वाद; अंजली दमानियांकडून सुप्रिया सुळेंवर प्रश्नांची सरबत्ती

प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या संपूर्ण व्यवहारावर तीव्र आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे.
सारंग लखानी यांच्या कंपनीला 1200 एकर जमीन देण्यावरून पेटला वाद; अंजली दमानियांकडून सुप्रिया सुळेंवर प्रश्नांची सरबत्ती
Anjali Damania, Supriya Sule

महाराष्ट्रातील सुमारे 1200 एकर शासकीय जमीन कोणत्याही प्रकारची निविदा न काढता एका खासगी कंपनीला देण्याच्या निर्णयावरून नवी राजकीय खळबळ उडाली आहे. प्रसिद्ध सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी या संपूर्ण व्यवहारावर तीव्र आक्षेप घेत राष्ट्रवादी काँग्रेसच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्यावर निशाणा साधला आहे. सुप्रिया सुळे यांच्या नातेवाइकांशी (जावई) संबंधित असलेल्या कंपनीला अवघ्या 2 आठवड्यांत 2 शासन निर्णय (GR) जारी करून ही जमीन बहाल करण्यात आल्याचा आरोप दमानिया यांनी केला. अवघ्या 3 महिन्यांपूर्वी जून महिन्यात ही जमीन सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) तत्त्वावर देण्याचे ठरले असताना, सप्टेंबरमध्ये थेट एकाच कंपनीला देण्याचा निर्णय कोणाच्या दबावाखाली घेण्यात आला, असा रोखठोक सवाल त्यांनी विचारला आहे.

हेही वाचा – ‘उगाच खोटे आरोप करून निवडणूक लढवू नका’! सोमेश्वर कारखाना निवडणुकीत पवार कुटुंबातील संघर्ष चिघळला; जय पवारांचा युगेंद्र पवारांवर थेट निशाणा

निविदा का काढली नाही? 48 वर्षांच्या करारासह सुरक्षा ठेव माफ करण्यावर आक्षेप

या भूखंड वाटपात मोठ्या प्रमाणावर नियम डावलण्यात आल्याचे सांगत अंजली दमानिया यांनी 8 प्रमुख मुद्दे उपस्थित केले आहेत. कोट्यवधी रुपयांच्या या व्यवहारात खुली निविदा प्रक्रिया राबवली असती, तर राज्य सरकारला अधिक भाडे मिळाले असते. थेट 48 वर्षे आणि पुन्हा 48 वर्षांच्या वाढीव कालावधीसाठी जमीन देताना अनामत रक्कम (Security Deposit) का माफ करण्यात आली, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. तसेच या जमिनीवर स्थापन होणाऱ्या प्रकल्पातून सरकारला अथवा नागरिकांना स्वस्त दरात वीज मिळणार आहे का, अशी विचारणा करत त्यांनी सरकारी जमिनीवरील मालकी हक्काबाबत चिंता व्यक्त केली.

राज्याच्या आर्थिक हितासाठी सुप्रिया सुळेंनी स्वतः चौकशीची मागणी करावी

या जमिनीवर संबंधित कंपनीला परस्पर उपभाडेपट्टा (Sublease) देण्याचा आणि भविष्यात जमीन विक्रीस निघाल्यास पहिला हक्क संबंधित कंपनीचा राहण्याचा नियम अत्यंत चुकीचा असल्याचे दमानिया यांनी स्पष्ट केले. सार्वजनिक हितासाठी जर ही जमीन परत हवी असेल, तर कंपनीची परवानगी लागणे हे सरकारच्या सार्वभौमत्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहे. “महाराष्ट्राची आर्थिक स्थिती सध्या अत्यंत बिकट आहे. त्यामुळे या संपूर्ण भूखंड वाटपाची निष्पक्ष चौकशी व्हावी आणि हे चुकीचे नियम तातडीने रद्द केले जावेत, यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी स्वतःहून पुढाकार घेऊन चौकशीची मागणी करावी,” असे आवाहनही त्यांनी केले आहे.

जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.

Home
Photo
Webstory
Videos
Exit mobile version