पुणे : राज्यात आज विधान परिषदेच्या ५ जागांसाठी मतमोजणी सुरू असताना पुण्यात धक्कादायक माहिती समोर आली आहे. विधान परिषदेच्या पुणे पदवीधर मतदारसंघाच्या मतमोजणी केंद्रावर आज सकाळी अचानक गोंधळ उडाल्याचे पाहायला मिळाले. मतमोजणी सुरू असतानाच आठ मतपेट्यांना अधिकृत सील नसल्याचे समोर आल्याने महाविकास आघाडीच्या उमेदवार हर्षदा देशमुख-जाधव यांनी यावर आक्षेप नोंदवला. या प्रकारामुळे निवडणूक अधिकारी, कर्मचारी आणि उमेदवारांच्या प्रतिनिधींमध्ये जोरदार खडाजंगी झाली. दरम्यान, मतमोजणी प्रक्रिया काही काळासाठी थांबवण्यात आली. पुणे पदवीधर मतदारसंघासाठी आज सकाळपासून बालेवाडी येथील केंद्रावर मतमोजणी सुरू झाल्यानंतर प्राथमिक फेऱ्यांची प्रक्रिया सुरू असतानाच काही मतपेट्या तपासणीसाठी टेबलवर आणण्यात आल्या. त्यावेळी आठ मतपेट्यांना आवश्यक असलेले निवडणूक आयोगाचे अधिकृत सील नसल्याचे महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी दावा केला. उमेदवार हर्षदा देशमुख यांनी यावर आक्षेप घेत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना जाब विचारला. आक्षेपांची पडताळणी करण्यासाठी अधिकाऱ्यांनी काही काळासाठी मतमोजणी प्रक्रिया स्थगित केली.