अखिल भारतीय किसान सभेच्या नेतृत्वाखाली 26 ऑक्टोबर 2026 रोजी हजारो शेतकरी आणि लाडक्या बहिणींनी अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले येथून मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या ‘वर्षा’ बंगल्याच्या दिशेने वाहन लाँगमार्च सुरू केला आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले शहरातून विविध मागण्यांसाठी हजारो आंदोलक मुंबईकडे रवाना झाले आहेत. गेल्या पाच दिवसांपासून तहसील कार्यालयासमोर या आंदोलकांचं महामुक्काम आंदोलन सुरू होत.
मात्र लाडक्या बहिणींच्या ई-केवायसीचा प्रश्नही ऐरणीवर असताना दुष्काळ मदत, कर्जमाफीसह विविध मागण्यांसाठी शेतकरी आणि लाडक्या बहिणींच्या मुंबईकडे जाणाऱ्या मोर्चाला सुरुवात झाली आहे. मुंबईकडे जाऊ नये अशी अकोले व मुंबई पोलिसांनी आंदोलकांना आंदोलकांना नोटीस पाठवली होती. तरीही आंदोलकांनी आपल्या भूमिकेवर ठाम राहत अकोले शहरात पायी फेरी काढत लाँग मार्चला सुरुवात केली आहे.
हेही वाचा- यंदा आनंदाचा शिधा नाही? दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी शिंदेसेनेचा मोठा निर्णय; 10 हजार…
शेकडो महिला पुरूष आंदोलक आपल्या मागण्या घेऊन वाहनातून मुंबईतील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धडकणार आहे. किसान सभेच्या वतीने पुकारलेल्या या लॉन्गमार्चमध्ये राज्यभरातील आंदोलक सहभागी झाले आहेत. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना मदत दिली जावी, लाडक्या बहिणींना पुन्हा अनुदान सुरू करावे, आदिवासी बांधवांना हक्कांच्या जमिनी दिल्या जाव्या, बांधकाम कामगारांना मदत दिली जावी, शेतकऱ्यांच्या कर्जमाफी इतर विविध मागण्यांसाठी किसान सभेने एल्गार पुकारला आहे.
अहिल्यानगर जिल्ह्यातील अकोले शहरातून हजारो आंदोलकांचे लाल वादळ मुंबईकडे रवाना झाले आहे. यावेळी हजारोंच्या संख्येने राज्यभरातील शेतकरी, आदिवासी, महिला आणि कामगार लॉन्ग मार्चला उपस्थित आहेत. ‘लाठ्या-काठ्या खाऊ, पण वर्षा बंगल्यावर धडक देऊ’ अशी आंदोलकांची भूमिका असून शेकडो वाहनांसह हे आंदोलक आक्रमक झाल्याचे पाहायला मिळत आहे.