सध्या संपूर्ण राज्यात दुष्काळाचे सावट पसरले असून, विशेषतः मराठवाड्यात भीषण पाण्याची आणि चाऱ्याची टंचाई निर्माण झाली आहे. अशातच जालन्यातून राजकीय नेत्यांची आणि कार्यकर्त्यांची बेफिकीरी उघडी पाडणारा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. भाजपच्या माजी आमदारांवर नोटाची उधळण होत असलेला व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओवर संताप व्यक्त केला जात आहे. मंगळवारी रात्री जालना शहरातील मंमादेवी मंदिर परिसरात भव्य भजन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात भाजपचे माजी आमदार आणि ज्येष्ठ नेते कैलास गोरंट्याल यांनी कार्यकर्त्यांच्या आग्रहास्तव भजनाच्या तालावर जोरदार ठेका धरला. मात्र, भजनाच्या या उत्साहात कार्यकर्त्यांनी थेट कैलास गोरंट्याल यांच्यावर नोटांची उधळण सुरू केली. एकीकडे शेतकरी पाण्यासाठी आणि पिकांच्या नुकसानीमुळे होरपळत असताना, दुसरीकडे अशा प्रकारे पैशांची उधळण होत असल्याचा व्हिडीओ समोर आल्यानंतर राज्यभरातून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, या वादग्रस्त व्हायरल व्हिडीओवर प्रतिक्रिया देताना भाजप नेते कैलास गोरंट्याल यांनी सांगितले की, “भजन कार्यक्रमाच्या आधी आम्ही देवाकडे दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठीच प्रार्थना केली होती. भजनाच्या भक्तीत माणूस इतका मंत्रमुग्ध आणि तल्लीन होऊन जातो की, त्या वेळी कोण काय करतो हे कोणाच्याच लक्षात येत नाही”, असा दावा गोरंट्याल यांनी केला आहे.