जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत खासदार निलेश लंके यांनी विजय मिळवल्यानंतर त्यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. विजयाची बातमी समजताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. यावेळी समर्थकांकडून घोषणाबाजी करत विजयाचा आनंद साजरा करण्यात आला. निलेश लंके यांच्या या विजयाची जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीच्या मतमोजणीत संजयकाका पाटील यांनी अटीतटीच्या लढतीत विजय मिळवला आहे. संजयकाका पाटील यांना ४० मते मिळाली, तर त्यांच्या प्रतिस्पर्धी सुमनताई पाटील यांना ३८ मते मिळाली. त्यामुळे अवघ्या दोन मतांच्या फरकाने संजयकाका पाटील यांनी विजय मिळवत बाजी मारली. या निकालामुळे सांगलीच्या सहकार क्षेत्रातील राजकीय समीकरणांची पुन्हा चर्चा सुरू झाली आहे.
जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांनी विजयासाठी आवश्यक असलेला ४५ मतांचा कोटा पूर्ण केला आहे. या गटात एकूण ८८ मते असून विजयासाठी ४५ मतांची आवश्यकता होती. पडळकर यांनी हा कोटा पूर्ण केल्याने त्यांच्या विजयाची केवळ औपचारिकता बाकी असल्याचे चित्र आहे. दरम्यान, मतमोजणीच्या ठिकाणीच पडळकर समर्थकांनी जल्लोष करण्यास सुरुवात केली असून, निकालाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत झालेल्या अटीतटीच्या लढतीत साताऱ्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी बाजी मारली आहे. या निवडणुकीत त्यांनी आपले पारंपरिक प्रतिस्पर्धी आणि भाजपचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांचा पराभव केला. या विजयामुळे शंभूराज देसाई यांच्या समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, निकाल जाहीर होताच कार्यकर्त्यांनी जल्लोष करत आनंद व्यक्त केला. साताऱ्याच्या राजकीय वर्तुळात या निकालाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे.
सांगली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निवडणुकीत 6 जागांची मतमोजणी प्रक्रिया मिरजेतील मार्केट यार्ड मध्ये सुरू झाली आहे. आठ टेबल वर पंचवीस कर्मचाऱ्यांच्या मदतीने ही मतमोजणी होत आहे. जिल्हा बँकेच्या निवडणुकीत १५ जागा बिनविरोध झाल्यानंतर उरलेल्या सहा जागांसाठी १३ उमेदवार मैदानात होतें. जत सोसायटी गटातून आमदार गोपीचंद पडळकर यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. तर तासगाव सोसायटी गटात माजी खासदार संजय पाटील आणि माजी आमदार सुमनताई पाटील यांच्यात कोण विजय होतो याकडे लक्ष असणार आहे. तर कवठेमहांकाळ सोसायटी गटात माजी मंत्री अजितराव घोरपडे यांच्यासमोर टी. व्ही. पाटील यांचे तर मिरज सोसायटी गटात अण्णासाहेब कोरे यांच्यासमोर भाजपचे अनिल शेगूनशे यांचे आव्हान होते.
सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागात डेंग्यूच्या रुग्णांमध्ये वाढ होत असतानाच मोहोळ तालुक्यातील बेगमपूर येथे दुर्दैवी घटना घडली आहे. दुसरी इयत्तेत शिकणाऱ्या 8 वर्षीय इजहार असिफ पठाण या चिमुकल्याचा डेंग्यूमुळे मृत्यू झाला. या घटनेनंतरही गावात स्वच्छता, फवारणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना झाल्या नसल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. परिसरात डेंग्यूचे रुग्ण आढळत असतानाही आरोग्य विभागाकडून पुरेशा उपाययोजना होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त केला जात आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात परतीच्या पावसाचा जोर कायम असून, अवकाळी पावसामुळे शेतकरी पुन्हा एकदा संकटात सापडले आहेत. रात्री रत्नागिरी, लांजा आणि संगमेश्वर तालुक्यांत जोरदार मेघगर्जनेसह पावसाने हजेरी लावली. अर्ध्या तासाहून अधिक काळ पावसाच्या जोरदार सरी कोसळल्याने हवामान विभागाचा अंदाज खरा ठरला. दरम्यान, या परतीच्या पावसाचा मोठा फटका कापणी केलेल्या भातशेतीला बसला असून, हातातोंडाशी आलेले पीक पावसामुळे खराब होण्याची भीती निर्माण झाली आहे. आधीच शेतीच्या संकटांचा सामना करणाऱ्या बळीराजाच्या चिंतेत आता आणखी भर पडली आहे.
भांडुपमधील बेस्ट बस अपघात प्रकरणात चालकाला मुंबई उच्च न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला होता, तर १२ जण जखमी झाले होते. दरम्यान, संबंधित चालकाला इलेक्ट्रिक बस चालवण्यासाठी आवश्यक प्रशिक्षण देण्यात आले होते का, असा गंभीर प्रश्न न्यायालयाने उपस्थित केला. प्रशिक्षणाशिवाय इलेक्ट्रिक बस चालवण्याची परवानगी कशी देण्यात आली, यावरून न्यायालयाने बेस्ट प्रशासनाच्या भूमिकेवर ताशेरे ओढले. चालकाच्या जामिनामुळे या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे.
शहरात डेंग्यूचा प्रादुर्भाव वाढत असतानाच आता मेडिकलमधील डॉक्टर, वैद्यकीय विद्यार्थी आणि परिचारिका प्रशिक्षणार्थींनाही डेंग्यूची लागण झाली आहे. सप्टेंबर आणि ऑक्टोबर या दोन महिन्यांत मेडिकलमधील एकूण ११ जणांचे डेंग्यू तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. यामध्ये सप्टेंबरमध्ये दोन, तर ऑक्टोबरमध्ये नऊ जणांना डेंग्यूची लागण झाली. दुसरीकडे, ऑक्टोबर महिन्यात शहरात डेंग्यूचे १२८ नवीन रुग्ण आढळल्याने एकूण रुग्णसंख्या १९३ वर पोहोचली आहे. त्यामुळे शहरातील डेंग्यूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.
मुंबईतील मालाड पश्चिम परिसरात सोमवारी रात्री लाकडाच्या गोदामाला आग लागल्याची घटना घडली. मालाडमधील आनंद रोडवरील रुईया वुड वेअरहाऊसमध्ये रात्री सुमारे ९ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली. रुईया मॅरेज हॉल आणि वल्लभदास नागराज शाळेजवळ असलेल्या दोन मजली इमारतीच्या तळमजल्यावर हे गोदाम आहे. गोदामात मोठ्या प्रमाणात लाकडी फळ्या आणि कार्डबोर्डचा साठा असल्याने आगीने पेट घेतला.
हिंगोली जिल्ह्यातील आरोग्य उपकेंद्रांवर समुदाय आरोग्य अधिकारी अर्थात CHO तब्बल १५-१५ दिवस अनुपस्थित राहत असल्याची तक्रार आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्याकडे करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते मुनीर पठाण यांनी संवाद यात्रेदरम्यान आरोग्यमंत्र्यांची भेट घेऊन ग्रामीण भागातील आरोग्यसेवेचा प्रश्न मांडला. या तक्रारीची गंभीर दखल घेत आरोग्यमंत्र्यांनी छत्रपती संभाजीनगरच्या आरोग्य उपसंचालिका वानेरे यांना तातडीने चौकशी करून आवश्यक कारवाई करण्याचे निर्देश दिले. आता या चौकशीतून नेमके काय समोर येते आणि दोषींवर काय कारवाई होते, याकडे लक्ष लागले आहे.
अहिल्यानगर जिल्हा सहकारी बँकेच्या १० जागांसाठी १४ तालुक्यांतील ३३ केंद्रांवर ९९.२७ टक्के मतदान शांततेत पार पडले. पाच तालुक्यांत शंभर टक्के, तर राहुरीत सर्वात कमी मतदान झाले. बँकेच्या २१ पैकी ११ जागा बिनविरोध झाल्या असून, १० जागांसाठी सहकार आणि परिवर्तन पॅनलमध्ये चुरशीची लढत आहे. सकाळी ९ वाजेपासून मतमोजणी सुरू होत असून, १४ तालुक्यांसाठी १४ टेबल्सची व्यवस्था केली आहे. पारदर्शकतेसाठी सीसीटीव्ही, व्हिडिओ शूटिंग आणि कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उमेदवारांच्या प्रतिनिधींसमक्ष मतमोजणी होणार असून, या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
कोकणातील मुख्य पीक असलेल्या भाताच्या मळणीला आता सुरुवात झाली आहे. मात्र, यंदा कमी पावसाचा मोठा फटका भात उत्पादनाला बसला असून, उत्पादनात निम्म्याने घट झाली आहे. भाताच्या लोंब्यांमध्ये दाण्यांचे प्रमाण कमी आणि अनेक ठिकाणी अर्धे पोळ असल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. घरापर्यंत भात नेण्याऐवजी शेताच्या बांधावरच मळणी करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. लागवडीपासून कापणीपर्यंत केलेला खर्चही वसूल होत नसल्याने कोकणातील बळीराजा हवालदिल झाला आहे.
जय महाराष्ट्र न्यूजवर ताज्या बातम्या आणि ब्रेकिंग न्यूज वाचा. अधिक माहितीसाठी भारताच्या बातम्या ब्राउझ करा.