मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या शिवतीर्थ या निवासस्थानी आज पत्रकार परिषद आयोजित करण्यता आली होती. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षासोबतची ही संयुक्त पत्रकार परिषद होती. यावेळी खासदार संजय राऊत पत्रकार परिषदेची सुरूवात करताना म्हणाले की, मन की बात आम्ही सांगू असं उद्धव आणि राज ठाकरे यांनी मला तुम्हाला सांगायला सांगितलं आहे. भ्रष्ट निवडणूक आयुक्त यांच्या विरोधातील पहिला एल्गार मुंबईतून होत आहे. मनसे आणि शिवसेना ठाकरे गट यांच्या पुढाकाराने विराट मोर्चा सुरू होईल. त्याची माहिती देण्यासाठी ही पत्रकार परिषद असल्याचे त्यांनी नमूद केले. यावेळी राज ठाकरे यांनी माहिती दिली की, येत्या 4 ऑक्टोबर रोजी मुंबईतील रिचर्ड अँड क्रूअर्ड्स कंपनी ते सीएसएमटीपर्यंत निवडणूक आयोगाच्या आयुक्तांविरोधात विराट मोर्चा काढण्यात येईल. सर्वच राजकीय पक्षांना मोर्चाचं आमंत्रण देण्यात येत आहे. या मोर्चाची सांगता मुंबई महानगरपालिका मुख्यालयासमोर होईल.