नवी दिल्ली : ईशान्य मुंबई महाविकास आघाडीचे खासदार संजय दिना पाटील हे शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे गट) सोडून शिंदे गटात जाणार असल्याच्या अफवा गेल्या काही दिवसांपासून प्रसारमाध्यमांमध्ये पसरत आहेत. मात्र, या अफवा निराधार असून त्यावर कोणीही विश्वास ठेवू नये, असे स्पष्टीकरण खासदार संजय दिना पाटील यांनी दिले आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना आता पूर्णविराम मिळाला आहे.
महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र सदनमध्ये नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमाला खासदार संजय दिना पाटील हे उपस्थित होते. तसेच, त्यांनी उपमुख्यमंत्री शिंदे यांच्या जेवणाचे निमंत्रणही स्विकारले होते. यामुळेच त्यांच्या पक्षांतराच्या चर्चांना उधाण आले. माजी आमदार राजन साळवी यांनी एकनाथ शिंदे शिवसेना गटात प्रवेश केला आहे. त्यानंतर संजय पाटीलदेखील शिंदे गटात प्रवेश करणार असल्याच्या अफवांनी जोर धरला.
मात्र, या चर्चा निराधार असल्याचे स्पष्टीकरण खासदार संजय दिना पाटील यांनी दिले आहे. "महाराष्ट्र सदनमध्ये झालेल्या कार्यक्रमाचे तसेच जेवणाचे निमंत्रण मिळाल्याने मी त्या ठिकाणी गेलो होतो. त्याचा चुकीचा अर्थ कोणीही काढू नये," असे त्यांनी स्पष्ट केले.
या संदर्भात अधिक माहिती घेण्यासाठी संजय दिना पाटील यांचे प्रसिद्धी प्रमुख सुरेश नंदिरे यांच्याशी संपर्क साधला असता, "ही केवळ अफवा असून संजय पाटील उद्धव ठाकरे गटातच आहेत," असे त्यांनी सांगितले. त्यामुळे पक्षांतराच्या चर्चांवर अखेर पडदा पडला आहे.
वाचा सविस्तर - दिल्लीतील महाराष्ट्र सदन सभागृहात मंगळवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा शरद पवारांच्या हस्ते महादजी शिंदे पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमामुळे ठाकरे गटामध्ये तीव्र नाराजी दिसून आली, कारण शिवसेना फुटीसाठी जबाबदार असलेल्या एकनाथ शिंदे यांचा सत्कार झाल्याने संजय राऊत यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली. मात्र, याच कार्यक्रमाला ठाकरे गटाचे खासदार संजय दिना पाटील उपस्थित होते, यावरून मनसेने संजय राऊतांना सवाल केला आहे. "यावर ते काही बोलणार का?"
एकनाथ शिंदे यांच्या सत्कार सोहळ्यावर ठाकरे गटाने टीका केली असली तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाने शरद पवारांची बाजू घेतली. मात्र, संजय दिना पाटील यांची या कार्यक्रमाला उपस्थिती ठाकरे गटासाठी धक्कादायक ठरत आहे.
सोहळ्याचे निमंत्रण असल्याने हजेरी – संजय दिना पाटील
संजय दिना पाटील हे पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होते आणि त्यांची शरद पवारांशी जवळीक आहे. त्यामुळेच ते या कार्यक्रमाला उपस्थित राहिले असावेत, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. खुद्द संजय दिना पाटील यांनी या संदर्भात स्पष्टीकरण देताना सांगितले की, “महाराष्ट्र राज्याचा अधिकृत कार्यक्रम असल्याने मी तिथे गेलो होतो. सर्वपक्षीय नेते उपस्थित होते. मला निमंत्रण मिळाले होते, त्यामुळे मी तिथे हजेरी लावली.”
शिवसेनेचे ‘ऑपरेशन टायगर’ सुरूच!
ठाकरेंच्या गटातील काही आमदार आणि खासदार शिवसेनेच्या संपर्कात असल्याच्या चर्चा सुरु आहेत. कालच रत्नागिरीतील माजी आमदार राजन साळवी यांनी ठाकरे गटाला सोडचिठ्ठी दिली होती आणि आज ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत. अशातच संजय दिना पाटील यांच्या उपस्थितीमुळे ठाकरे गटात आणखी खळबळ उडाली आहे.
"काही जण प्रकाशात आले, काही अजून नाहीत" – उदय सामंत
मंत्री उदय सामंत यांनी यावर सूचक विधान करताना सांगितले, “काही जण आता प्रकाशात आले आहेत, काही अजून यायचे आहेत.” त्यामुळे ठाकरे गटातील आणखी काही नेते शिवसेनेच्या वाटेवर असल्याची शक्यता नाकारता येत नाही.