जुगल पाटील, प्रतिनिधी
जळगाव : विधान परिषद निवडणुकीच्या निकालानंतर महायुतीतील अंतर्गत कलह चव्हाट्यावर आला आहे. विधान परिषदेच्या पाच जागांपैकी 3 जागा मविआने तर दोन जागा महायुतीने जिंकल्या आहेत. महायुतीला जिंकता न आलेल्या जागेवरून सध्या भाजप आणि शिवसेनेच्या नेत्यांमध्ये आरोप – प्रत्यारोप होत आहेत. याबाबत शिवसेना नेते गुलाबराव पाटील यांनीदेखील आपले मत मांडले आहे.
विधानपरिषद निवडणुकीत शिवसेनेने समन्वय ठेवला असता तर दोन जागा अधिक जिंकता आल्या असत्या असा आरोप भाजपने केला असून यावर उत्तर देताना पाटील म्हणाले की, ही निवडणूक राजकीय पक्षांपेक्षा शिक्षक आणि पदवीधरांची असते. यात पक्षापेक्षा व्यक्तीला आणि उमेदवाराच्या प्रभावाला मतदार जास्त महत्त्व देतात. जर आमच्यात काही दुरावा निर्माण झाला असेल, तर तो दूर करण्याचे अधिकार माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे नाहीत. त्यावर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री योग्य तो निर्णय घेतील. अशा निवडणुकांमध्ये काही गोष्टी घडतात, परंतु हा दुरावा भविष्यात कसा कमी करता येईल याचाच आम्ही प्रयत्न करू. तसेच विधान परिषद निवडणुकीत शिवसेनेने नाशिकच्या जागेचा बदला घेतला का, याबात पाटील म्हणाले की, बदला घेण्याचा इथे काही प्रश्नच येत नाही. आमचे 237 आमदारांचे भक्कम सरकार आहे, त्यामुळे असा कोणताही व्यक्तिगत किंवा राजकीय बदला घेण्याचा विषय उद्भवत नाही.
महायुतीला आता आत्मचिंतनाची गरज आहे, या संजय राऊतांच्या वक्तव्याला गुलाबराव पाटील यांनी उत्तर देताना सांगितले की, संजय राऊत यांनी आधी स्वतःचे आत्मचिंतन करावे. त्यांच्याकडे अजून आत्मा शिल्लक आहे का, हे तपासावे आणि मगच चिंतनाच्या गोष्टी कराव्या. दरम्यान, जिल्हा बँक निवडणूक महायुतीची अद्याप एकही संयुक्त बैठक नाही, यावर बोलताना पाटील म्हणाले की, अर्ज भरल्यानंतरही माघारीसाठी जवळपास 18 दिवसांची मोठी मुदत असते. त्यामुळे इच्छुक कार्यकर्त्यांना अर्ज भरण्यापासून कुणी रोखू शकत नाही. एकदा अर्ज दाखल झाले की तिन्ही घटक पक्ष एकत्र बसून जागावाटपावर तोडगा काढतील आणि महायुती करण्याचा पूर्ण प्रयत्न केला जाईल. युती झाल्यास कार्यकर्त्यांमधील वाद मिटतात आणि बँकेचे हितही जपले जाते. ज्या बँकेचा एनपीए (NPA) 59 टक्के आहे, तिला वाचवण्यासाठी आपसात लढण्यापेक्षा एकत्र येऊन मार्ग काढणे आवश्यक आहे. तसेच 21 पैकी 10 जागांवर दिग्गज नेत्यांना यंदा निवडणूक लढवता येत नसले तरी, मी पूर्वीही निवडणूक लढलेलो नसल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या पात्र आहे, असे पाटील म्हणाले. मात्र 10 दिग्गज नेते जरी थेट मैदानात नसले, तरी त्यांच्याच ‘झेरॉक्स कॉपी’ निवडणुकीच्या रिंगणात उतरल्या आहेत, असे पाटील यांनी नमूद केले.