सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर 31 ऑक्टोबर रोजी त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्त कुंड आणि नवीन घाट येथे ध्वजारोहण होणार आहे. कुंभमेळा ध्वजारोहण सोहळा आणि महामहिम राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर मंदिर बंद ठेवण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय जिल्हा प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. त्याचसोबत 31 ऑक्टोबर रोजी त्र्यंबकेश्वर येथे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या उपस्थितीत होणाऱ्या धार्मिक कार्यक्रमांच्या पार्श्वभूमीवर नाशिक-त्र्यंबकेश्वर वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल करण्यात आले आहेत.
30 ऑक्टोबर रोजी दुपारी 12 वाजल्यापासून ते 31 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजेपर्यंत त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी बंद राहणार आहे. राष्ट्रपतींच्या दौऱ्यादरम्यान सुरक्षेच्या दृष्टीने हा निर्णय घेण्यात आला असून, या कालावधीत भाविकांना मंदिरात जाऊन दर्शन घेता येणार नाही. यासोबतच कुंभमेळा ध्वजारोहण सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर आणि नाशिक शहरातील वाहतूक व्यवस्थेतही बदल करण्यात येणार आहेत. त्यामुळे या काळात त्र्यंबकेश्वरला दर्शनासाठी जाण्याचे नियोजन करणाऱ्या भाविकांनी मंदिर सुरू होण्याची वेळ आणि वाहतुकीसंदर्भातील प्रशासनाच्या सूचनांची माहिती घेऊनच प्रवास करावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
नाशिक-त्र्यंबकेश्वर वाहतूक मार्गात मोठे बदल
30 ऑक्टोबर सकाळी 8 ते 31 ऑक्टोबर रात्री 8 वाजेपर्यंत नाशिक-त्र्यंबकेश्वर मुख्य रस्ता वाहतुकीसाठी राहणार बंद असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यावेळी त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी नियमित 30 किलोमीटरचा मार्ग बंद राहणार असून त्याऐवजी 55 किलोमीटर पर्यायी मार्गाचे अंतर पार करावे लागणार आहे. त्यामुळे नाशिककरांना त्र्यंबकेश्वरला जाण्यासाठी 30 किलोमीटरचा अतिरिक्त प्रवास करावा लागणार आहे.
यादरम्यान अमृत चौक – बारदान फाटा – गोवर्धन – गिरणारे – धोंडेगाव – देवरगाव – वाघेरा फाटा – अंबोली फाटा – सापगाव – त्र्यंबकेश्वर या पर्यायी मार्गांचा वापर करून त्र्यंबकेश्वरला पोहोचता येईल. वाहतूक कोंडी टाळण्यासाठी पोलिस प्रशासनाने नियोजन केले असून, वाहतूक अधिसूचनेचे पालन करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक डॉ. स्वामी यांनी केले आहे.