मुंबई: भारतीय संस्कृतीत लग्न एक पवित्र आणि मंगलमय कार्य असते. या शुभ कार्यात फक्त दोन व्यक्ती नसून दोन कुटुंब एकत्र येतात. लग्नापूर्वी काही विधी केले जातात. त्यापैकी एक म्हणजे हळदीचा विधी. हा विधी तुम्ही अनेकदा पाहिला असाल. लग्न होण्याच्या अवघ्या काही दिवसांपूर्वी वधू आणि वरांना हळद लावली जाते. ही परंपरा शतकानुशतके चालत आली आहे. मात्र, तुम्हाला सुद्धा हा प्रश्न पडला असेल की वधू-वरांना हळद लावण्यामागील नेमके कारण काय आहे? चला तर सविस्तर जाणून घेऊया.
'हे' आहेत हळद लावण्यामागील अध्यात्मिक कारणे
1. शुभतेचे प्रतीक: हळद हा एक मसाला आहे जो सद्गुण वाढवतो आणि शुद्धता दर्शवतो. एकप्रकारे, हळद हे पवित्रतेचे, सौंदर्यतेचे आणि शुभतेचे प्रतीक मानली जाते. लग्नापूर्वी हळद लावल्याने नकारात्मक ऊर्जा निघून जाते. तसेच, वधू-वरांचे जीवन नव्याने आणि शुभ उर्जेने सुरू होते.
2. दैवी संरक्षण: मान्यतेनुसार, हळदीत देवी लक्ष्मी वास करते. या कारणाने, नव्या जोडप्यांच्या आयुष्यात सुख आणि समृध्दीचे आगमन व्हावे, यासाठी वधू-वरांना हळद लावली जाते. विशेष बाब म्हणजे, हळद लावल्यानंतर एखादी नकारात्मक उर्जा, वाईट शक्ती किंवा कुणाची दृष्ट लागू नये यासाठी देखील हळद लावली जाते.
3. ऊर्जा शुद्धीकरण करण्यासाठी: मान्यतेनुसार, हळदीचा रंग सूर्य, प्रकाश, आत्मा आणि ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. त्यामुळे, वधू-वरांच्या आध्यात्मिक आणि मानसिक उर्जेला जागृत करून त्यांच्या लग्नासाठी विधीवत शुद्धीकरण केले जाते.
'हे' आहेत हळद लावण्यामागील वैज्ञानिक कारणे
1. हळदीचे जंतुनाशक गुणधर्म: हळदीमध्ये नैसर्गिक अँटीबॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि अँटीफंगल गुणधर्म असतात. त्यामुळे, त्वचेसंबंधित संक्रमण टाळण्यासाठी आणि शरीर स्वच्छ ठेवण्यासाठी हळद लावणे उपयुक्त आहे.
2 . त्वचा नितळ आणि उजळ बनवण्यासाठी: हळद लावल्याने त्वचेतील डाग, मुरुम, राप आलेले भाग मऊ होतात. या कारणामुळे, लग्नाच्या दिवशी वधू आणि वर सुंदर तसेच तजेलदार दिसतात. नैसर्गिकरित्या हळद त्वचेचा रंग उजळवते आणि त्वचेचे संरक्षण देखील करते.
3. तनावमुक्त करणारे गुणधर्म: हळदीचा सुगंध आणि स्पर्श शरीर आणि मनाला शांत करतो. लग्नाच्या गर्दीत मानसिक ताण कमी करण्यासाठीही हळद लावणे फायदेशीर आहे.
4. रोगप्रतिकारशक्ती वाढवते: हळदीत असणारे कर्क्युमिन हे घटक शरीरातील रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात. म्हणूनच वधू-वरांना हळद लावली जाते.
(DISCLAIMER: येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. जय महाराष्ट्र त्याची हमी देत नाही.)