Neha Borah Delhi High Court CJP Protest: मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्याची मागणी करत दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून सातत्याने आंदोलने आणि मोर्चे काढले जात आहेत. ‘कॉक्रोच जनता पार्टी’ (CJP) आणि विविध विद्यार्थी संघटनांच्या वतीने हे आंदोलन तीव्र करण्यात आले आहे. दरम्यान, या संपूर्ण प्रकरणात ‘ऑल इंडिया स्टुडंट्स असोसिएशन’च्या (AISA) राष्ट्रीय अध्यक्षा नेहा बोरा यांनी दिल्ली उच्च न्यायालयात एक महत्त्वपूर्ण आणि मोठा दावा केला आहे. 16 ऑक्टोबर रोजी झालेल्या CJP च्या आंदोलनापासून आपण स्वतःला पूर्णपणे वेगळे केले असून, त्या आंदोलनाशी आपले काहीही देणेघेणे नाही, असे त्यांनी न्यायालयात स्पष्ट केले आहे.
10,000 रुपयांच्या वैयक्तिक बॉण्डवरील पोलिसांच्या नोटीसला आव्हान
दिल्ली पोलिसांनी नेहा बोरा यांना 10,000 रुपयांच्या वैयक्तिक बॉण्डवर आपले म्हणणे मांडण्याचे निर्देश दिले होते. या पोलिसांच्या नोटीसला आव्हान देणाऱ्या याचिकेवर गुरुवारी उच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. यावेळी नेहा बोरा यांच्या वतीने बाजू मांडताना ज्येष्ठ विधिज्ञ गोपाल शंकरनारायणन यांनी न्यायालयात सांगितले की, कनॉट प्लेस येथील सेंट्रल पार्कमध्ये ‘सीजेपी’ने पुकारलेल्या आंदोलनात नेहा बोरा यांचा प्रत्यक्ष वा अप्रत्यक्ष अजिबात सहभाग नव्हता. त्यामुळे त्या आंदोलनाशी त्यांना जोडणे चुकीचे असल्याचे त्यांनी न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिले.
ज्या वेळी सीजेपीचे आंदोलन सुरू होते, त्या वेळी नेहा बोरा मंडी हाऊस येथे आंदोलनात..
न्यायालयात युक्तिवाद करताना स्पष्ट करण्यात आले की, 16 October रोजी जेव्हा सेंट्रल पार्क येथे सीजेपीचे आंदोलन सुरू होते, अगदी त्याच वेळी नेहा बोरा या दुसऱ्या ठिकाणी म्हणजेच मंडी हाऊस येथे स्वतःच्या ‘एआयएसए’ संघटनेच्या आंदोलनाचे नेतृत्व करत होत्या. सीजेपीचे संस्थापक अभिजित दिपके यांनी तिरंगा मोर्चाची घोषणा केली होती, त्यादरम्यान नेहा बोरा यांनी सायंकाळी 5:15 वाजता मंडी हाऊस येथून आपल्या कार्यकर्त्यांसह मोर्चाला सुरुवात केली होती. मात्र, त्याच वेळी पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले होते आणि जवळपास 12 तासांच्या अटकेनंतर शनिवारी पहाटे 6 वाजता त्यांची सुटका करण्यात आली होती.
विद्यार्थी राजकारणाचा आक्रमक चेहरा म्हणून ओळख; ‘इंडिया’ आघाडीच्या आंदोलनातही सहभाग
अवघ्या 29 वर्षांच्या नेहा बोरा सध्या भारतातील विद्यार्थी राजकारणातील एक अतिशय आक्रमक आणि चर्चेत असलेला चेहरा बनल्या आहेत. पोलिसांसोबत झालेला संघर्ष, धरपकड आणि अटकेत असतानाही सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुणांना आंदोलनासाठी प्रवृत्त केल्यामुळे त्या सोशल मीडियावर ‘शेरनी’ म्हणून विशेष प्रसिद्धीस आल्या आहेत. मुख्य निवडणूक आयुक्तांच्या विरोधातील या लढ्यात त्यांनी केवळ विद्यार्थी नेता म्हणून नव्हे, तर ‘इंडिया’ आघाडीच्या (INDIA Bloc) सर्वोच्च नेत्यांसोबत आणि विशेषतः राहुल गांधींच्या बरोबर सर्वोच्च न्यायालयाकडे काढलेल्या मोर्चानंतर एका प्रमुख राजकीय व्यक्तिमत्त्वाच्या रूपाने स्वतःची ओळख निर्माण केली आहे.
आंदोलनांच्या कायदेशीर गुंतागुंती वाढल्या
एकिकडे राजकीय वर्तुळात ज्ञानेश कुमार यांच्या राजीनाम्यावरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष पेटला असताना, दुसरीकडे विद्यार्थी नेत्या नेहा बोरा यांनी उच्च न्यायालयात घेतलेल्या या भूमिकेमुळे या प्रकरणाला वेगळेच वळण मिळाले आहे. पोलिसांची नोटीस आणि सीजेपीच्या आंदोलनापासून त्यांनी फारकत घेतल्यामुळे आता या कायदेशीर लढाईत पुढे काय घडणार, याकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले असून न्यायालयाच्या पुढील निर्णयाची प्रतीक्षा केली जात आहे.
हेही वाचा – GST चे नवे नियम ठरणार गेमचेंजर! सरकारच्या मोठ्या निर्णयाकडे देशाचं लक्ष; तुमच्या खिशावर काय होणार परिणाम?